उलाढाल मंदावली
By Admin | Published: November 13, 2016 12:29 AM2016-11-13T00:29:03+5:302016-11-13T00:27:29+5:30
बीड : पाचशे-हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर समाजजीवनावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवत आहेत.
बीड : पाचशे-हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर समाजजीवनावर त्याचे दूरगामी परिणाम जाणवत आहेत. सलग चौथ्या दिवशी व्यापारपेठेत प्रचंड शुकशुकाट जाणवला. कोट्यवधींची उलाढाल हजारापर्यंत गडगडल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची झळ व्यापाऱ्यांना पोहोचली आहे.
चार दिवसांपासून एटीएम बंद असल्यामुळे व्यापारपेठेत पैशांची चणचण जाणवत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये लांबलचक रांगा लागत असून, अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. अडीच लाखापर्यंतच्या व्यवहारापर्यंत अडचणी नाहीत, असे शासनाने स्पष्ट केले आहे. अनेकांना लाखोंचे व्यवहार समोर येऊ नये असे वाटत आहे. त्यामुळे उसनवारी व उधारीवरच बहुतांश व्यवहार सुरू आहेत. दोन हजार रूपयांच्या नोटा काहींना मिळाल्या असल्या तरी सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. पाचशे-हजार रूपयांच्या नोटा कोणी स्वीकारायला तयार नाही. तसेच दोन हजार रूपयांच्या नोटेच्या चिल्लरचे वांधे आहेत. त्यामुळे अनेकांचे व्यवहार दुहेरी कात्रीत सापडले आहेत.
कूपन २००, नोटा १५० जणांनाच
अंबाजोगाईमध्ये नोटा बदलण्यासाठी नागरिकांना संपूर्ण दिवस खर्ची करावा लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून २०० जणांना कूपन वाटप केले जात आहे. मात्र, दिवसभरात केवळ १५० जणांनाच नोटा बदलून मिळत आहेत. त्यामुळे उर्वरित नागरिकांना रिकाम्या हाती परत फिरावे लागत आहे.
एटीएमवर ग्राहकांच्या चकरा
बँकेमध्ये रांगा आहेत. त्यामुळे खात्यावर जमा असलेले पैसे काढणे ग्राहकांना अवघड बनले आहे. त्यात एटीएमचे शटर चार दिवसांपासून डाऊनच आहे. काही ठिकाणचे एटीएम सुरू आहेत. मात्र, तेथेही तोबा गर्दी आहे. एटीएम सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा असून, ग्राहकांच्या चकरा सुरू आहेत.
एसटीच्या उत्पन्नावर परिणाम
पाचशे-हजार रूपयांच्या नोटांद्वारे एसटीमध्ये केवळ आरक्षित तिकीट काढता येत आहे. वाहक अशा नोटा स्वीकारत नाहीत. दोन हजारांची नवीन नोट दिली तर परत सुटे देण्यासाठी अडचणी आहेत. त्यामुळे एसटीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी घटले आहे. ग्रामीण भागात प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. (प्रतिनिधी)