औरंगाबादचा तुषार भारतीय तलवारबाजी संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:23 AM2018-07-20T00:23:33+5:302018-07-20T00:24:41+5:30
औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू तुषार आहेर याची भारतीय तलवारबाजी संघात निवड झाली आहे. तुषार चीनमधील वुक्सी येथे २२ ते २७ जुलैदरम्यान होणाऱ्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी दिली. या स्पर्धेसाठी तुषार आज चीनला रवाना झाला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू तुषार आहेर याची भारतीय तलवारबाजी संघात निवड झाली आहे. तुषार चीनमधील वुक्सी येथे २२ ते २७ जुलैदरम्यान होणाऱ्या जागतिक तलवारबाजी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे यांनी दिली. या स्पर्धेसाठी तुषार आज चीनला रवाना झाला आहे.
चीनमधील जागतिक स्पर्धेसाठी औरंगाबाद येथे १९ मे ते १८ जुलैदरम्यान विद्यापीठाच्या साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सराव शिबीर सुरू होते. या शिबिरात आपला विशेष ठसा उमटवत तुषारने भारतीय संघातील स्थान निश्चित केले. तुषारने याआधीही गतवर्षी तैवान येथील जागतिक आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच थायलंड येथील बँकॉक येथेही त्याने देशाचे प्रतिनिधित्व करताना आपला ठसा उमटवला आहे. तुषारने आतापर्यंत विविध स्पर्धेत एकूण ४0 पदकांची लूट केली आहे. त्यात त्याने १२ राष्ट्रीय स्पर्धेत ५,३ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत ४ व राज्यस्तरीय स्पर्धेत १७ पदके जिंकली आहेत. चीनमधील जागतिक स्पर्धेतही तुषार भरीव कामगिरी करेल, असा विश्वास उदय डोंगरे यांनी व्यक्त केला.
तुषार आहेर याची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दिनेश वंजारे, संजय भूमकर, तुकाराम मेहेत्रे, स्वप्नील तांगडे, अजय त्रिभुवन, सागर मगरे आदींनी त्याचे अभिनंदन करीत जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.