मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सत्तार- भाजप कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:12 PM2019-08-27T13:12:07+5:302019-08-27T13:14:13+5:30
सत्तार यांनी कार्यक्रमच ‘हायजॅक’ केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे
सिल्लोड : भाजपची महाजनादेश यात्रा बुधवारी २८ आॅगस्ट रोजी सिल्लोडमध्ये पोहोचणार आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी भाजपचे पदाधिकारी व आमदार अब्दुल सत्तार यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. एकाच जागेसाठी दोघांनीही परवानगी मागितली. सत्तार यांनी हा कार्यक्रमच ‘हायजॅक’ केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मात्र गोची झाली आहे.
सिल्लोडमधील प्रियदर्शनी चौकात एकाच जागेवर भाजप व आमदार सत्तार या दोन्ही गटांनी परवानगी मागितल्यामुळे तणाव वाढला असून, पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर दोन गटांत तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करण्याचे नियोजन केले आहे. दोन्ही गटांत वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी खा. रावसाहेब दानवे व आ. संतोष दानवे यांची भेट घेतली. मात्र, वाद होणार नाही. कार्यक्रम शांततेत होईल. तुम्ही निश्चिंत राहा, असा विश्वास दानवे पिता-पुत्रांनी पोलिसांना दिल्याची गोपनीय माहिती आहे.
महाजनादेश यात्रेत अब्दुल सत्तार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी गावागावात बैठका घेऊन लोक जमा करत आहेत. या सभेत शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांना ताकद दाखविण्याचे काम अब्दुल सत्तार करताना दिसत आहेत. त्या तुलनेत सिल्लोड तालुक्यातील भाजप पदाधिकारी पक्षाच्या आदेशानुसार काम करत असल्याचे दिसत असले, तरी सत्तार यांच्या तुलनेत बॅनर, पोस्टर, प्रसिद्धीमध्ये भाजपचे जुने कार्यकर्ते कमी पडल्याचे चित्र आहे.
सत्तार यांच्या प्रवेशाची चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या स्वागत समारंभातच आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा जोर धरत आहे. याहीवेळी त्यांचा प्रवेश होतो की त्यांना पुन्हा तारीख दिली जाते, हे उद्याच कळेल. मात्र, अब्दुल सत्तार यांनी या जनादेश यात्रेत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी जोर लावला आहे.
हा भाजपचा कार्यक्रम आहे
अब्दुल सत्तार काय करतात तो त्यांचा प्रश्न आहे. सर्व कार्यक्रमाचे नियोजन भाजपने केले आहे. अब्दुल सत्तार यांचा प्रवेश होणार नाही, असा विश्वास तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे, सुरेश बनकर, इद्रिस मुलतानी, सुनील मिरकर यांनी व्यक्त केला.