'शिवाई ट्रस्ट'च्या इमारतीवरून खैरे - शिरसाट यांनी थोपटले दंड; इमारत पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:14 PM2023-02-22T14:14:43+5:302023-02-22T14:17:59+5:30
शिवसेना भवन म्हणून या इमारतीची निर्मिती करण्यात आली, मात्र, वादामुळे इमारत ‘खंडहर’ होत चालली आहे.
औरंगाबाद : श्री शिवाई ट्रस्टच्या मालमत्तेवरून शिंदे व ठाकरे गटांमध्ये वादंग उभे राहिले आहे. शिवाई ट्रस्टच्या नावाने औरंगपुरा नाल्यावरदेखील टोलेजंग इमारत बांधली गेली असून २६ वर्षांपासून ही इमारत वादाचा केंद्रबिंदू राहिली आहे. शिंदे गटाचे आ. संजय शिरसाट यांनी ती इमारत चंद्रकांत खैरे यांच्या ‘तोडपाणी’चे साधन असल्याचा खळबळजनक आरोप केला, तर खैरेंनी पलटवार करताना आ.शिरसाट यांच्यामुळेच ती इमारत पूर्णत्वास गेली नाही. त्यांच्यामुळेच शिवसेना भवन उभारणीचे स्वप्न अर्धवट राहिल्याचा आरोप केला.
शिवसेना भवन म्हणून या इमारतीची निर्मिती करण्यात आली, मात्र, वादामुळे इमारत ‘खंडहर’ होत चालली आहे. ३१ मे १९९७ ते ३१ मे २०२७ असा ३० वर्षांचा शिवाई ट्रस्टच्या इमारतीचा करार आहे़ जनहित याचिका, बांधकाम परवानगी, वाढीव एफएसआयवरून ती इमारत वादग्रस्त ठरली आहे. इमारत उभी राहण्यास १४ वर्षे गेली. २०२७ पर्यंत भाडेकरार आहे़ जुना करार रद्द करून नवीन करार २०१२ ते २०४२ पर्यंत करण्यासाठी मनपाने परवानगी दिलेली नाही.
काय करणार होते त्या इमारतीमध्ये?
व्यापारी संकुल व विश्रामगृह, प्रदर्शन हॉलची शिवाई ट्रस्टच्या औरंगपुरा नाल्यावरील आठ मजली इमारतीत सोय असेल, असा दावा करण्यात आला आहे. नाल्यावरील या इमारतीला १ एफएसआय आहे़ सुमारे १ हजार ३०० चौ़.मी़. नाल्याचे पात्र इमारतीखाली आले आहे़
शिरसाट काय म्हणाले?
शिवाई ट्रस्टने कंत्राटदारासोबत केलेला करार आहे. बीओटीचा करार असून शिवाई ट्रस्टच्या मालकीची इमारत नाही. मनपाला एक रुपयाचे भाडेही मिळालेले नाही. त्या इमारतीत काही भाग शिवाई ट्रस्टला मिळणार होता. भाडेकरार संपत आला आहे. खैरेंनी कंत्राटदारासोबत केलेली ‘तोडपाणी’ आहे. तोच कंत्राटदार औरंगपुरा भाजी मंडई, शहागंज, वसंत भवनसाठी आहे. त्या प्रकल्पांची काय अवस्था आहे, ते पाहा. खैरेंच्या चुकीमुळे शिवसैनिकांना बसायला जागा राहिली नाही.
खैरेंचा पलटवार
शिरसाट यांनी त्या इमारतीला विरोध केला होता. त्यामुळेच शिवसेना भवन पूर्ण झाले नाही. कष्टाने ती इमारत उभी केली. परंतु झारीतील शुक्राचार्याप्रमाणे शिरसाट यांनी आडकाठी आणली. शिवाई सेवा ट्रस्टची ती अधिकृत जागा आहे. शिरसाट शिवसेनेत असताना त्या इमारतीस त्यांनी विरोध केला. सध्या त्यांची बांधकामे सुरू आहेत, ती अधिकृत आहेत काय, असा सवाल करत खैरे म्हणाले, शिवसेनेच्या जिवावर मोठे झाले आणि आता गद्दारी करून आमच्यावर आरोप करत आहेत, जनता यांना सोडणार नाही.