रेल्वेच्या पीटलाइनवरून केंद्रीय मंत्र्यांत रस्सीखेच; भाजपतील दुफळी उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2022 06:36 PM2022-01-04T18:36:43+5:302022-01-04T18:40:08+5:30

रावसाहेब दानवे यांच्याकडून जालन्यात घोषणा, तर भागवत कराड यांच्याकडून औरंगाबादेत पीटलाइनची मागणी

Tussle between union ministers Raosaheb Danave and Bhagwat karad on the railway pitline; BJP faction exposed | रेल्वेच्या पीटलाइनवरून केंद्रीय मंत्र्यांत रस्सीखेच; भाजपतील दुफळी उघड

रेल्वेच्या पीटलाइनवरून केंद्रीय मंत्र्यांत रस्सीखेच; भाजपतील दुफळी उघड

googlenewsNext

औरंगाबाद : जालन्याला पीटलाइन ( Railway Pitline ) करण्याची घोषणा रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांनी केली. त्यानंतर औरंगाबादेतही पीटलाइन करण्याची मागणी करण्याचा पवित्रा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांनी घेतला. त्यामुळे रेल्वेच्या पीटलाइनवरून दोन मंत्र्यांतील आणि भाजपतील दुफळी समोर आल्याची चर्चा सुरू आहे. (Tussle between union ministers Raosaheb Danave and Bhagwat karad) 

डाॅ. भागवत कराड यांनी औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या चेअरमनची बैठक १६ सप्टेंबर रोजी घेतली होती. त्यानंतर रावसाहेब दानवेदेखील औरंगाबादेत बैठक घेण्यासाठी सरसावले आणि औरंगाबादेत २१ ऑक्टोबर रोजी रेल्वे प्रश्नांवर बैठक झाली. द. म. रेल्वेचे नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालय आहे. या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या विभागातील लोकप्रतिनिधींची नांदेड येथे बैठक होते. मात्र, अनेक वर्षांनंतर औरंगाबादेत रेल्वेची बैठक झाली. याच बैठकीत दानवे यांनी पीटलाइनसाठी औरंगाबादेत महिनाभरात जागा शोधण्याची जबाबदारी कराड आणि खा. इम्तियाज जलील यांच्यावर सोपवली होती. या सगळ्यानंतर रविवारी दानवे यांनी पीटलाइन जालन्यात करण्याची घोषणा केली. जालन्यात म्हणजे मराठवाड्यात पीटलाइन होत आहे, ही आनंदाची बाब आहे; पण औरंगाबादेतही पीटलाइन केली जावी, अशी मागणी केली जाईल, असे डाॅ. भागवत कराड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पीटलाइन पुन्हा औरंगाबादला आणणार?
रेल्वे स्टेशनवर डिसेंबर २०२० मध्ये झालेल्या बैठकीत ‘पीटलाइनसाठी प्रस्ताव पाठवा, पुढे मी पाहतो’, अशी डाॅ. कराड यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना केली होती. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडेही त्यांनी पीटलाइनची मागणी केली होती. पीटलाइन जालन्याला करण्याची घोषणा झाली असली तरी डाॅ. कराड यांच्या मागणीमुळे ही पीटलाइन जालन्यात होते की औरंगाबादला, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

रेल्वेचे हेही प्रश्न ‘जैसे थे’
- माॅडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा रेंगाळलेला.
- शिवाजीनगर भुयारी मार्गाची प्रतीक्षा.
- रोटेगाव ते कोपरगाव रेल्वे मार्ग रेंगाळलेला.
- औरंगाबाद-चाळीसगाव रेल्वे मार्ग.

Web Title: Tussle between union ministers Raosaheb Danave and Bhagwat karad on the railway pitline; BJP faction exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.