छत्रपती संभाजीनगरवरुन रस्सीखेच; शिंदेसेनेचा दावा, मात्र उमेदवारीबाबत कराड निश्चिंत
By विकास राऊत | Published: March 12, 2024 12:03 PM2024-03-12T12:03:17+5:302024-03-12T12:04:57+5:30
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, हिंगोली या तीन जागांबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : येथील लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू असून वाटाघाटीत जागा कोणाला सुटते आणि उमेदवार कोण, याविषयी उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, हिंगोली या तीन जागांबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. मागील आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. गृहमंत्री शाह यांनी आपल्या भाषणात एमआयएमचे विद्यमान खा. इम्तियाज जलिल यांचा नामोल्लेख टाळून केलेली सूचक टीका, निवडक नेत्यांच्या बैठकीत दिलेला कानमंत्र आणि केलेले शक्तिप्रदर्शन लक्षात घेता संभाजीनगरची जागा भाजप लढविणार असल्याचे संकेत मिळाले होते. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तर केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची उमेदवारीच घोषित करून टाकली होती.
मात्र, मुंबई आणि दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यात आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेची आता भर पडली आहे. शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेत्यांनी या जागेसाठी जोर लावला आहे. शिवाय, पक्षाबाहेरील कोणाही व्यक्तीस उमेदवारी दिली जाऊ नये, असा आग्रह धरल्याचे समजते तर दुसरीकडे मुंबईत झालेल्या बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी ही जागा शिंदे गटाला सोडण्यास जोरदार विरोध केल्याचे समजते. भाजपकडे डॉ. कराड, मंत्री अतुल सावे यांच्यासारखे सक्षम उमेदवार असल्याने ही जागा आपणच लढवावी, असा आग्रह धरल्याचे समजते. या घडामोडींबाबत डॉ. कराड म्हणाले, वरिष्ठ स्तरावर निर्णय झाला असून बाकी चर्चा म्हणजे वावड्या आहेत. आम्ही प्रचाराला लागलो आहोत.
मराठवाड्यातील तीन जागांचा वाद
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव, हिंगोली या तीन जागांवरून महायुतीत वाद आहे तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघाचाही वाद आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटले. शिष्टमंडळाने जागा आपलीच आहे, पक्षातीलच उमेदवार द्यावा, अशी मागणी केली तर भाजपचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीस यांना भेटून जागा भाजपने का लढावी, हे ठामपणे मांडून आले.
शिंदे गटाचाच उमेदवार लढणार
ही जागा शिंदे गटाचाच उमेदवार लढेल. ही जागा आम्हाला सुटावी, असा मुद्दाच नाही. जागा शिवसेनेचीच आहे आणि शिवसेनाच लढणार आहे.
- संदिपान भुमरे, पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर
जागा शिवसेनेचीच
जागा शिवसेनेचीच आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला संधी मिळावी. अशी मागणी आहे. उमेदवारी कुणाला द्यायची, याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील.
-संजय शिरसाट, आमदार, शिंदे गट
जागा तर भाजपच लढेल....
भाजपने पूर्ण मतदारसंघात काम केले असून, सध्याही काम सुरू आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे तसा आग्रह धरला आहे. भाजपला संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.
-शिरीष बोराळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप
हा मतदारसंघ आमचाच
जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार पाहता ही जागा आमचीच आहे. भुमरे यांनी जिल्ह्यात अनेक गावांत कामांना निधी दिला आहे. तसेच हा मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याने आमची मागणी आहे.
-रमेश पवार, जिल्हाप्रमुख शिवसेना (शिंदे गट)