वॉर्ड सभापतींसाठी रस्सीखेच; आज मतदान, तीन प्रभागांत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:43 AM2018-04-04T00:43:22+5:302018-04-04T15:21:55+5:30
महानगरपालिकेच्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग समितींच्या सभापतीपदी बन्सी जाधव, रमेश जायभाये आणि सुमित्रा हळनोर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महानगरपालिकेच्या नऊ प्रभागांपैकी तीन प्रभाग समितींच्या सभापतीपदी बन्सी जाधव, रमेश जायभाये आणि सुमित्रा हळनोर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. सहा प्रभागांमध्ये सभापतीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून, सभापती निवडण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजता मतदान घेण्यात येणार आहे. पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम काम पाहणार आहेत.
नवीन सभापती निवडण्यासाठी सोमवारपासून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. बुधवारी सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात आले. प्रभाग क्रमांक-४ हर्सूलच्या सभापतीपदासाठी बन्सी जाधव, प्रभाग-७ मालखरे अपार्टमेंट येथील सभापतीपदासाठी रमेश जायभाये आणि प्रभाग क्रमांक-९ क्रांतीचौक येथील सभापतीपदासाठी सुमित्रा हळनोर यांचा एकच अर्ज प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे, तर प्रभाग क्रमांक-१ टाऊन हॉल येथे आशा निकाळजे, खान नसरीन बेगम आणि परवीन कैसर खान यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग-२ मोंढा येथे बबिता चावरिया आणि रेशमा कुरेशी या दोघांनी अर्ज भरले.
प्रभाग-३ सेंट्रल नाका येथे सय्यद सरवत बेगम आणि पठाण अस्मा फिरदोस, प्रभाग-५ सिडको येथे सुरेखा खरात आणि भारती सोनवणे, प्रभाग-६ सिडको येथे मनोज गांगवे आणि सोहेल शेख, प्रभाग-८ सातारा येथे अप्पासाहेब हिवाळे आणि सायली जमादार यांचे अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष सभेत मतदानाद्वारे या प्रभाग समिती सभापतींची निवड होणार आहे.
सेना-भाजप युतीने प्रभाग समिती सभापतीपदांबाबतही करार केला आहे. ९ प्रभागांपैकी ७ प्रभागांमध्ये युतीचे संख्याबळ अधिक आहे. त्यातील ३ पदे सेनेकडे, तर ४ पदे भाजपकडे राहणार आहेत. एका प्रभागात एमआयएम नगरसेवकांची संख्या अधिक आहे, तर राहिलेल्या एका प्रभागात एमआयएम आणि सेनेचे संख्याबळ आहे. येथे एका अपक्षाला सेनेने पाठिंबा दिला
आहे.