'तुझा सैराट करू'; छत्रपती संभाजीनगरात ऑनर किलिंग; मृताच्या पत्नीचे वडिलांवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 11:39 AM2024-07-27T11:39:26+5:302024-07-27T11:40:48+5:30
वडिलांनी दिली होती धमकी, मारेकऱ्यांचे कुटुंब कुलूप लावून पसार
छत्रपती संभाजीनगर : आंतरधर्मीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून अमित मुरलीधर साळुंके (२५) या तरुणाची त्याच्या सासरा व मेव्हण्याने निर्घृण हत्या केली. इंदिरानगरमध्ये १४ जुलै रोजी त्याच्यावर त्यांनी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर अद्यापही सासरा गीताराम भास्कर कीर्तिशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तिशाही हे पसार आहेत. अमितच्या मृत्यूनंतर दोघांचे कुटुंब घराला कुलूप लावून पसार झाले आहे.
अमितने २ मे रोजी लहानपणीची मैत्रीण विद्यासोबत पळून जाऊन लग्न केले होते. भिन्न धर्मांमुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. अमितच्या कुटुंबीयांनी दोघांना स्वीकारल्याने ते घरी परतले होते. अमितच्या कुटुंबीयांनी विद्याच्या कुटुंबीयांना देखील दोघांना आनंदाने स्वीकारण्यासाठी अनेकदा विनंती केली. मात्र, विद्याच्या कुटुंबीयांचा अमितवरचा रोष कायम होता. खुनाच्या धमक्या ते देत होते. १४ जुलै रोजी रात्री अमितवर गीताराम व आप्पासाहेबने चाकूने वार केले. २५ जुलै रोजी अमितची मृत्यूशी झुंज संपली.
पोलिसांची परिसरात गस्त
अमितच्या कुटुंबीयांसह मित्रांनी मारेकरी अद्यापही मोकाट असल्याच्या कारणावरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री संताप व्यक्त केला. सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंब परत गेले. शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर परिसरात गस्त घालत आरोपींचे घर तपासण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आरोपींची घरे कुलूपबंद आहेत.
‘तुझा सैराट करू’
अमितची पत्नी विद्याने मात्र वडील व कुटुंबावर गंभीर आरोप केले. कुटुंबाने माझे बळजबरीने दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरवले हाेते. त्यासाठी त्यांनी मुलाकडून ४ लाख रुपये घेतले होते. मला मात्र ते लग्नच मान्य नव्हते. त्यानंतर मी अमितसोबत माझ्या संमतीने लग्न केले. आम्ही आमच्या दोन्ही धर्माच्या पध्दतीने लग्न केले. तरी कुटुंबाने स्वीकारले नाही. लग्नानंतर माझे कुटुंबीय सतत मला 'तुझा सैराट करू' अशा धमक्या देत होते. अमितची हत्या हा कट रचून केली आहे, असा आरोपही तिने केला.