बुरखाधारी महिलांनी चोरले सव्वादोन तोळ्यांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:05 AM2021-03-17T04:05:02+5:302021-03-17T04:05:02+5:30
औरंगाबाद : पोत गाठण्यासाठी जाताना रस्त्यात एका महिलेच्या पर्समधील सव्वादोन तोळ्यांचे दागिने आणि पाच हजारांची रोकड, असा एकूण १ ...
औरंगाबाद : पोत गाठण्यासाठी जाताना रस्त्यात एका महिलेच्या पर्समधील सव्वादोन तोळ्यांचे दागिने आणि पाच हजारांची रोकड, असा एकूण १ लाख ११०० रुपयांचा ऐवज बुरखाधारी महिलांच्या टोळीने चोरी केल्याची घटना सोमवारी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास गेंदा भवनजवळ घडली.
शहाबाजार भागात अशोकनगर येथील लोकसेवा दूध डेअरीसमोरील रहिवासी शेख शहेजाद हे खेळणी विक्री करण्याचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी फिरदोस बेगम या आपल्या मावशीसोबत सोमवारी दुपारी सोन्याची पोत गाठण्यासाठी सराफा बाजारात गेल्या होत्या. जाताना त्यांनी सोन्याची पोत, राणीहार आणि कर्णफुले असे एकूण सव्वादोन तोळ्यांचे दागिने व रोख पाच हजार रुपये एका क्रीम रंगाच्या पाकिटात ठेवून ते प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले होते. फिरदोस बेगम ह्या गेंदा भवनजवळ पोत गाठण्यासाठी जात असता वाटेत तीन बुरखाधारी महिलांपैकी एकीने त्यांना धक्का दिला, तर दुसरीने प्लास्टिक पिशवीला ब्लेडने कापून त्यातील सव्वादोन तोळ्यांचे दागिने आणि पाच हजारांची रक्कम लंपास केली. त्यांनी जेव्हा पोत गाठण्यासाठी पिशवीत पाहिले, तर त्यांना दागिन्यांचे लहान पाकीट गायब झाल्याचे दिसले.
त्यांनी गोंधळलेल्या अवस्थेत दागिन्याचे पाकीट शोधले. मात्र, ते कुठेही सापडले नाही. त्यांनी यासंबंधी सिटी चौक ठाण्यात जाऊन घडलेली घटना सांगितली. सहायक निरीक्षक खटाने यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तेव्हा त्या परिसरात तीन बुरखाधारी महिला संशयितरीत्या वावरताना दिसून आल्या. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकट..............
बुरखाधारी टोळी सक्रिय
सिटी चौक, रंगारगल्लीत गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या बुरखाधारी महिलांची टोळी सक्रिय असल्याचे अनेक घटनांवरून निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी गेंदा भवनजवळ दागिने गाठण्यासाठी गेलेल्या दोन महिलांचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली होती. याशिवाय सिटी चौक परिसरातदेखील दोन महिलांचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स चोरीला गेली होती. एका सराफाच्या दुकानातून सोने खरेदी करण्याचा उद्देशाने एका बुरखाधारी महिलेने दुकानातून दागिने लंपास केले होते. चोरीच्या या घटनांपैकी अद्याप एकही गुन्हा उघड झालेला नाही.