बारावीत पुन्हा मुलींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2017 11:45 PM2017-05-30T23:45:30+5:302017-05-30T23:48:19+5:30
जालना : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला असून, यंदाही मुलीनींच बाजी मारली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर झाला असून, यंदाही मुलीनींच बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ८८.४९ टक्के इतका लागला. मराठवाड्यात जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे.
फेब्रुवारी/मार्च २०१७ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य शाखेच्या सुमारे २६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २६ हजार ९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी मंगळवारी जाहीर झालेल्या आॅनलाईन निकालात २३ हजार ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल कसा लागेल या भीतीने मंगळवारी सकाळपासूनच विद्यार्थ्यांत धाकधूक सुरू होती. निकालाची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दुपारी एकच्या सुमारास शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर गर्दी केली होती.
तर स्मार्ट फोनमुळे बहुतांश विद्यार्थ्यांनी मोबाईलवरच निकाल पाहिला. यावर्षी औरंगाबाद विभागाचा निकाला ८९.८३ टक्के लागला आहे. यामध्ये औरंगाबाद, बीड, परभणी नंतर जालन्याचा क्रमांक येतो. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा ९५.३२ कला शाखेचा ८३.४८ टक्के तर कॉमर्सचा ८८.९३ टक्के निकाला लागला आहे.
मराठवाड्यात जिल्हा गुणवत्तेत मागे राहिला असला तरी गतवर्षी ८७ टक्के असलेला निकाल यंदा ८८.४९ टक्के इतका लागला आहे.