ठिबकचे १२९ कोटी थकले
By Admin | Published: June 15, 2016 11:48 PM2016-06-15T23:48:27+5:302016-06-16T00:12:27+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी शेतीत ठिबक सिंचनाचा अवलंब करणाऱ्या मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान सरकारने थकविले आहे.
सुनील कच्छवे, औरंगाबाद
पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी शेतीत ठिबक सिंचनाचा अवलंब करणाऱ्या मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांचे अनुदान सरकारने थकविले आहे. सलग तीन वर्ष सरकारने विभागास मंजूर अनुदानापेक्षा कमी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे विभागातील सुमारे ३० हजार शेतकऱ्यांचे तब्बल १२९ कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. शासकीय अनुदानाच्या भरवशावर बहुसंख्य शेतकऱ्यांनी कर्ज काढून किंवा उसनवारी करून ठिबक संच बसविलेले आहेत. परिणामी अनुदानच रखडल्यामुळे आता हे शेतकरी अडचणीत आले आहेत.
शेतीत पाण्याच्या सुयोग्य वापरासाठी राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान राबविले जाते. याअंतर्गत ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ टक्क्यांपर्यंतचे अनुदान दिले जाते. त्यासाठी आधी शेतकऱ्याने स्वत: संपूर्ण रक्कम खर्च करून हे संच बसवायचे असतात. त्यानंतर कृषी विभागाकडून अनुदानाची देय रक्कम अदा केली जाते. मागील काही वर्षांपासून सतत पाण्याचे दुर्भिक्ष भासत असल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये सूक्ष्म सिंचनाविषयी मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. म्हणूनच अडचणीत असूनही येथील शेतकरी ठिबक संच बसवीत आहेत. मात्र, आता शासनाकडून वेळेत अनुदानाची रक्कम मिळत नसल्यामुळे (पान २ वर)
एकीकडे सरकार ठिबकसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते आणि दुसरीकडे त्यांचे अनुदान थकविते हे चुकीचे आहे. विभागातील असंख्य शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन ठिबक संच बसविले होते. अजूनही त्यांना अनुदान मिळालेले नाही. शासन त्यावर निर्णय घेत नाही. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.
- जयाजीराव सूर्यवंशी, अध्यक्ष अन्नदाता शेतकरी संघटना