वैश्विक संस्कृतीचा वारसा ठरलेल्या अजिंठा लेणी दृगोचराचे द्विशतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 08:10 AM2019-04-28T08:10:05+5:302019-04-28T08:15:02+5:30

चित्रप्रतिकृतीकरण आणि लेखांकनकरणाच्या दृष्टीतून घेतलेला आढावा

Twenty-two decades of Ajanta caves sighting as a legacy of global culture | वैश्विक संस्कृतीचा वारसा ठरलेल्या अजिंठा लेणी दृगोचराचे द्विशतक

वैश्विक संस्कृतीचा वारसा ठरलेल्या अजिंठा लेणी दृगोचराचे द्विशतक

googlenewsNext

- प्रा. डॉ. पी. डी. जगताप

अजिंठा येथे एकूण तीस लेण्या आहेत. मांडणीच्या क्रमानुसार पुरातत्व खात्याने अनुक्रमांक दिलेले आहेत. या लेण्यांपैकी क्र. ९, १०, १९ व २६ चैत्य आहेत, तर बाकीचे विहार आहेत. क्र. ९ व १० हे हीनयान चैत्य आहेत, तर क्र. १९ व २६ महायान चैत्य आहेत. क्र. ८, ९, १०, १२ व १३ ही लेणी इ.स. पूर्वी दुसऱ्या शतकातील तर उर्वरित ख्रिस्तोत्तर सहाव्या व सातव्या शतकातील आहेत. क्र. ३, १४, २३, २४, २७, २८, २९ व ३० या लेण्या अपूर्ण आहेत. सुमारे दीड कि.मी. लांबीचा, बेसाल्ट खडकाचा, अखंड कडा तोडून त्यात या लेण्या कोरलेलल्या आहेत.

अजिंठा येथील लेण्यांपैकी क्र. १, २, ९, १०, १६, १७, १९ व २१ या लेण्यांच्या भिंतींवर, खांबांवर व छतांवर चित्रे रंगविलेली आहेत. बाकीच्या लेण्यांच्या भिंतींवरही चित्रे रंगविलेली असावीत, असे अनुमान काढता येते. क्र. १, २, १६ व १७ या लेण्यांतील चित्रे बऱ्याच सुस्थितीत आहेत आणि तीच विशेष विख्यात आहेत. बुद्धाच्या जीवनातील व पूर्वजन्मातील कथा (जातक)लोककथांतील प्रसंग हे अजिंठा लेणी चित्रपटाचे मुख्य विषय आहेत. कला आणि इतिहासाच्या दृष्टीने अद्वितीय महत्त्व असलेल्या बुद्धमूर्ती, नागराजा, महानिर्वाणाचे शिल्प, मार विजय इ. शिल्पे व चित्रांच्या माध्यमातून जातक, तसेच अवदान कथेच्या माध्यमातून तत्कालीन राहणीमान, वेशभूषा, केशभूषा, खानपान, शस्त्रास्त्र, स्थापत्य, प्रथापरंपरा, करमणुकीची साधने, दळणवळणाची साधने, पशुपक्षी, वृक्षवल्ली, आचार-विचार या सांस्कृतिक मूल्यांबरोबरच प्रामुख्येकरून बुद्ध धर्माचे प्रदर्शन बुद्ध धर्माची शिकवण जनतेसमोर मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. 

अजिंठ्याची लेणी अत्यंत निसर्गरम्य अशा ठिकाणी भिंतीसारखा नैसर्गिक कडा असलेल्या अखंड, बेसाल्ट प्रकाराच्या खडकात कोरलेल्या आहेत. अजिंठ्याच्या पठारावर वाघूर नदीतीरावर लेणापूर नावाचे खेडे, लेणी कोरली जात होती. तेव्हा त्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या व कारागिरांच्या वस्तीसाठी हे खेडे वसलेले होते. लेणापूरनजीक उगम पावणाऱ्या वाघूर नदीच्या काठी एका चंद्राकलाकृती वाकणात ही लेणी कोरलेली आहे. जणू ही लेणी धारण करण्याकरिता येथील कड्याने स्तुपाच्या बाह्यरेषेचा आकार धारण केलेला आहे. नदीचा झुळझुळता प्रवाह, खोल डोह, प्रवाहाशेजारी अडीचशे फूट उंचीचा खडा कडा, प्रवाहाच्या सपाटीपासून सुमारे पन्नास ते शंभर फूट उंचीवर कड्याच्या कुशीत कोरलेली लेणी, भोवताली उंच डोंगर, गर्द राईच्या दऱ्या आणि अखेरीस सातकुंड नावाचा सातमजली धबधबा. स्थापत्य, शिल्प व चित्रांसह एवढे नैसर्गिक सौंदर्य दुसऱ्या कोणत्याही लेण्याच्या वाट्याला आलेले नाही, अशा रम्यस्थानाची निवड व कलाकार मांडणी ही अजिंठ्याची अद्वितीय लक्षणे असलेले लेणे जवळपास हजार बाराशे वर्षे अज्ञातवासात होते.

सातवाहन काळात इ.स. पूर्व दुसऱ्या शतकापासून, तर वाकाटक राजाच्या काळात सुमारे सातव्या शतकापर्यंत अजिंठा लेण्यांची भरभराट होत होती. चिनी प्रवासी व्हेनत्सांग याने बदामीचा चालुक्य राजा पुलकेणी द्वितीय यांचे आमदानीतील प्रवास वर्णनात अजिंठा लेण्यांचा सविस्तर उल्लेख केला आहे, तसेच अजिंठा लेणी क्र. १ मध्ये मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर पुलकेशी याचे आमदानीतील एक प्रसंग, पर्शियन राजाराणीचे चित्र, चित्रित केलेले असून, लेणी नं. २६ आणि २७ मधील शिलालेखात राष्ट्रकुटांचे स्पष्ट उल्लेख आहेत. मौर्य राजांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला. बुद्ध धर्माला चालना दिली. त्यातील शेवटचा राजा बृहद्रथ याचा वध त्याचाच सेनापती पुण्यमित्र शुंग याने केला. शुंग घराण्याची स्थापना केली. वैदिक धर्माला चालना दिली. ‘यथा राजा तथा प्रजा’ या उक्तीप्रमाणे बुद्ध धर्माला ओहोटी लागली. सातव्या, आठव्या शतकाच्या सुमारास बुद्ध धर्माचा ऱ्हास झाला. ओघानेच बुद्ध भिक्खूअजिंठा लेणी सोडून अन्यत्र गेल्याने नवव्या शतकात तर अजिंठा लेणी ओस पडली.

बुद्ध धर्माचा ऱ्हास सुरू झाल्यानंतर अजिंठ्याची लेणी विस्मृतीत गेली. बदलत्या काळाबरोबर भोवतालच्या जंगली जमातींचा कल फिरला आणि भिक्खूंना तेथे राहणे, यात्रेकरूंना तेथे जाणे अशक्य झाले. पावसाबरोबर वाहून येणाऱ्या मातीने काही लेणी भरून गेली. सभोवार जंगल वाढले, अहिंसक भिक्खूंची जागा हिस्र श्वापदांनी घेतली. त्यांच्या भीतीने लोक अजिंठा लेण्यांकडे फिरकेनासे झाले. वहिवाट बंद झाल्याने लेण्यांकडे जाणाऱ्या पायवाटेवर भौगोलिक निसर्ग नियमाप्रमाणे गवत, झाडे-झुडपे उगवली आणि जवळपास  हजार-बाराशे वर्षे म्हणजे एकोणिसाव्या शतकातील दुसऱ्या दशकापर्यंत इ.स. १८१९ पर्यंत आता वैश्विक संस्कृतीचा वारसा ठरलेले स्थळ जगाला माहीत असल्याचे दिसत नाही. अज्ञात होते. 

१८१८ च्या इंग्रज-मराठा युद्धानंतर परतीच्या वाटेवर निघालेल्या इंग्रज बटालियनचा पाडाव अजिंठागाव परिसरात पडला असता १८१९ साली स्थानिकांच्या माहितीवरून वाघाच्या शिकारीस निघालेला, मद्रास आर्मीतील २८ क्रमांकाच्या घोडदळ तुकडीतील एक ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याला अज्ञातवासात असलेली अजिंठा लेणी दिसली. सदर अधिकाऱ्याने नेहमीप्रमाणे आपल्या दैनंदिनीमध्ये २८ एप्रिल १८१९ ला अजिंठा लेणी स्थापत्य, शिल्प, चित्रांचे दर्शन झाल्याचे नोंदवले. क्र. १० च्या लेण्यांतील १३ व्या खांबावर John Smith 20th cavalry 28 April 1819 असा शिलालेख आहे.जॉन स्मिथ या अधिकाऱ्याची दैनंदिनी मद्रास येथून कोलकाता आणि तेथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लंडनस्थित मुख्यालयात पोहोचली. तेथील वाचनात अजिंठा लेणी स्थापत्य शिल्पचित्रांचा उल्लेख आला. त्याची दखल कंपनीने घेऊन भारतस्थित ‘रायल एशियाटिक सोसायटी’ला सदर लेण्यांचा अभ्यास व संरक्षण करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार १८२२ मध्ये सर विल्यम एर्स्किन यांनी आपल्या लेखनात जॉन स्मिथ दैनंदिनी ईस्ट इंडिया कंपनीचे निर्देशनासह अजिंठा लेणी स्थापत्य, शिल्प व चित्रांची चर्चा केली आहे. 

इ.स. १८२८ मध्ये कॅप्टन ग्रेसले आणि राल्फ यांनी अजिंठा लेणीला भेट देऊन चित्रांचा अभ्यास करून बंगाल एशियाटिक सोसायटीच्या कार्यपत्रिकेत अहवाल प्रसिद्ध केला. इ.स. १८२८ मध्येच जॉन मालकौम यांनी डॉ. जे. बर्ड यांना या लेण्यांचे अवलोकन करण्यास्तव पाठवले. त्याचा अहवाल ‘हिस्टारिकल रिसर्चेस्’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. जेम्स प्रिन्सेप यांनी ‘Fascimiles various ancient Inscription’ हा अजिंठा लेण्यातील शिलालेखांवर आधारित रिपोर्ट ‘जर्नल आॅफ एशियाटिक सोसायटी आॅफ बेंगाल’मध्ये इ.स. १८३६ यावर्षी प्रसिद्ध करून अजिंठा लेणी चित्रांच्या प्राथमिक, अस्सल संदर्भ साधनाचे दालन अभ्यासकांना उघडून दिले, निर्माण केले. 

इ.स. १८३९ ला लेफ्टनंट ब्लॅक यांनी अजिंठा लेण्यांचे अभ्यासपूर्ण वर्णन बॉम्बे कोरियर’मध्ये छापून प्रकाशित केले. तेव्हाचे जेम्स फर्ग्युसन यांनी इ.स. १८३९ पासून अजिंठा लेण्यांचा स्थापत्य, शिल्प, चित्रांसह समग्र अभ्यास करून ‘जर्नल आॅफ रायल एशियाटिक सोसायटी - ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड’ यात इ.स. १८४३ प्रसिद्ध केले. दि.२८ एप्रिल १८१९ रोजी इंग्रज सैन्याचा २८ क्रमांकाच्या घोडदळ तुकडीतील अधिकारी, पट्टेदार वाघाच्या शिकारीनिमित्ताने हाकाऱ्यासह वाघूर नदी खोऱ्यात उतरला असता जॉन स्मिथला दिसलेल्या मानवनिर्मित लेण्यांची शिरस्त्याप्रमाणे दैनंदिनीत नोंदवून अजिंठा लेणी शोधाची माहिती तत्कालीन ब्रिटिश राजकर्त्यांपर्यंत पोहोचवली. त्याप्रमाणे विल्यम एर्स्किन (१८२२), कॅप्टन ग्रेसले आणि राल्फ (१८२८), जान मालकॉम आणि जे बर्ड (१८२८), जेम्स प्रिन्सेप (१८३६), लेफ्टनंट ब्लॅक (१८३९), जेम्स फर्ग्युसन (१८३९-१८४३) यांनी संकलन, संशोधन आणि लेखन करून ईस्ट इंडिया कंपनीसह जगाला अजिंठा लेणी अभ्यासाचे माहात्म्य आणि महत्त्व पटवून दिले.

परिणामी, ब्रिटिश लष्करातील मद्रास आर्मीतील कॅप्टन गिल (कालौघात मेजर झाले) या चित्रकाराची लेणी चित्रांचे संवर्धन व प्रतिकृती तयार करण्यासाठी ‘ईस्ट इंडिया कंपनीने इ.स. १८४५ मध्ये नेमणूक केली. मेजर रॉबर्ट गिल (हे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.) यांना अजिंठा रंगचित्रांच्या प्रतिकृती सर्वप्रथम तयार करण्याचे श्रेय जाते. त्यांनी तयार केलेल्या अजिंठा लेणी चित्रांच्या प्रतिकृती दुर्दैवाने इंग्लंडमधील क्रिस्टल पॅलेसमध्ये भरलेल्या चित्रप्रदर्शनाला आग लागली. जागेच्या उपलब्धीअभावी प्रदर्शित न केलेल्या पाच चित्रप्रतिकृती वाचल्यात त्या साऊथ कैनसिंग्टन येथील भारतीय संग्रहालयात आहेत. मे. रॉबर्ट गिल यांच्या चित्रप्रतिकृतीवरून जिओस्कार्फ यांनी तयार केलेली रेखाचित्रे श्रीमती स्पिअर यांच्या ‘लाईफ इन एशियन इंडिया’ या ग्रंथात प्रकाशित झाले आहेत, तर जेम्स बर्जेस अँड जेम्स फर्ग्युसनलिखित ‘आर्किओलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडिया’ या लंडन येथून प्रकाशित, तसेच ‘केव्ह टेम्पल आॅफ इंडिया’ या दिल्ली येथून १९६९ मध्ये प्रकाशित ग्रंथात अजिंठा, लेणीस्थापत्य शिल्प, चित्र, तसेच शिलालेखांचा सविस्तर आढावा घेतला आहे.

जेम्स फर्ग्युसन यांच्या सूचनेवरून ईस्ट इंडिया कंपनी सरकारने जेम्स ग्राफीथ यांची अजिंठा लेणी चित्रांच्या प्रतिकृती तयार करण्यास्तव नियुक्ती केली. तत्कालीन ‘बॉम्बे स्कूल आॅफ आर्ट म्हणजे सध्याचे जे.जे. स्कूल आॅफ आर्टचे प्राचार्यपद देऊन स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने जेम्स ग्रिफीथ यांनी इ.स. १८७५ यावर्षी कामाला सुुरुवात करून इ.स. १८८५ साली काम सुरू राहिले. या दहा वर्षांच्या काळात एकशे पंचवीस कलाकृती तयार करून त्या लंडन येथील साऊथ केनिंगस्टन म्युझियममध्ये पाठविण्यात आल्या. १२ जून १८८५ मध्ये त्या प्रदर्शित झाल्या असता त्यातील ८७ चित्रे आगीत भस्म झाली. उर्वरित चित्रे आणि नक्षीकाम ‘द पेंटिंग इन बुद्धिष्ट केव्ह टेम्पल आॅफ अजंता’ या ग्रंथात समाविष्ट असून, सदरचा ग्रंथ दोन खंडांत इ.स. १८९६ आणि १८९७ यावर्षी ब्रिटनमध्ये प्रकाशित करण्यात आला. या प्रकाशनाच्या जगात तीनच मूळप्रती उपलब्ध आहेत. त्यातील एक मूळप्रत मराठवाड्यातील औरंगाबादस्थित डॉ. बा.आं. म. विद्यापीठ, औरंगाबाद येथे उपलब्ध आहे, हे विशेष.

लेडी हेरिंगहॅम हिने सय्यद अहमद, मुहमद फजलुद्दीन, नंदलाल बॉस, असितकुमार हलदर, सुरेंद्रनाथ गुप्ता या भविष्यात प्रसिद्ध पावलेल्या विद्यार्थ्यांच्या साह्याने इ.स. १९०९ ते १९११, अशी तीन वर्षे परिश्रम करून काढलेल्या अजिंठा चित्रप्रतिकृती ‘अजंता फ्रेस्कोज’ या ग्रंथात इ.स. १९१५ मध्ये प्रकाशित केल्या आहेत. इ.स. १९१५ मध्ये सय्यद अहमद यांनी तयार केलेल्या चित्रप्रतिकृतींचे फोटोग्राफ घेऊन हैदराबाद येथील निझाम सरकारच्या आर्किओलाजी विभागाचे प्रमुख डॉ. गुलाब याजदानी यांनी ‘अजंता’ या शीर्षकाखाली अनुक्रमे चारखंडात इ.स. १९३०, १९३३, १९३३ व १९३५ मध्ये प्रसिद्ध करून निझाम सरकारच्या आधिपत्याखाली अजिंठा लेण्यांचे संरक्षण व स्वच्छतेच्या दृष्टीने भरीव प्रयत्न केले.

डॉ. गुलाम याजदानी यांनी ‘इंडियन पेटिंग्ज’ तसेच ‘वाल पेंटिंग्ज आॅफ अजंता- १९४१’, सी. शिवराममूर्ती यांनी ‘इंडियन पेंटिंग्ज- १९४२, तसेच १९४५ मध्ये लिहून अजिंठा लेणी चित्रांवर प्रकाश टाकला. जे.एन.यू. दिल्लीच्या सौजन्याने ‘गाईड टू अजंता फेस्को’ १९४९ लिहून अजिंठा चित्रांची तांत्रिक माहिती दिली. मदनजितसिंह यांनी युनेस्कोच्या साह्याने चित्रांचा एक अल्बम आणि नंतर इ.स. १९६५ मध्ये ‘दी पेंटिंग्ज आॅफ अजंता’ या नावाने ग्रंथ प्रदर्शित केला. महाराष्ट्र आणि गोवा आर्किओलॉजीचे संचालक, तसेच केंद्र सरकार, दिल्ली— आर्किओलॉजीचे प्रमुख एम.एन. देशपांडे, बी.बी. लाल, अमलानंद घोष, इनग्रीड आल यांच्या संयुक्त प्रयत्नाने विविध दृष्टिकोनातून लिहिलेला ‘अजंठा म्युरल्स’ हा रंगचित्रयुक्त ग्रंथ इ.स. १९६७ मध्ये प्रकाशित झाला.

‘इंडियन एन्टिक्युरी’च्या ५९ व्या खंडात के.डी.बी. कौड्रिंग्टन यांनी, तसेच डेक्कन अभिमत विद्यापीठ, पुणे येथील मधुकर केशव ढवळीकर यांनी अजिंठ्याच्या भित्तीचित्रांच्या साहाय्याने ‘लाईफ इन द डेक्कन अ‍ॅज डिपिक्टेड इन अजंता पेंटिंग्ज’ या शीर्षकाचा शोधप्रबंध पूर्ण विद्यापीठात इ.स. १९६३ मध्ये सादर करून पुणे विद्यापीठ प्रकाशन विभागातर्फे त्यावर इ.स. १९७३ ला पुस्तकदेखील प्रकाशित केले आहे.

देबला मित्रा यांनी ‘अजंता’ या शीर्षकाखाली ग्रंथ लिहून लेणींची क्रमवार माहिती इ.स. १९६८ मध्ये दिली आहे. इ.स. १९६८ मध्येच सी. शिवराम मूर्ती यांनी ‘साऊथ इंडियन पेंटिंग्ज’ या ग्रंथात कालक्रमवार, तसेच राजघराण्यानुसार भारतातील चित्रकलेची माहिती देताना अजिंठा चित्रकलेबाबत सविस्तर माहिती देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.  डॉ. बाळकृष्ण दाभाडे या तज्ज्ञाने इ.स. १९७३ यावर्षी ‘टेक्निक आॅफ वॉल पेंटिंग इन एनशियंट इंडिया’ मध्ये चित्रकलेच्या दृष्टीतून सविस्तर आढावा घेऊन बाघ, बदामी, वेरूळ, कांचीपुरम, तंजावर येथील चित्रांसह अजिंठा चित्रांचा सविस्तर ऊहापोह केलेला आहे.

अजिंठा लेणी चित्रप्रतिकृती बनविण्यात ग्रिफीथ, लेडी हेरिगहॅम, नंदलाल बोस, असितकुमार हलदर, के. व्यंकटप्पा, समरेंद्रनाथ इत्यादी कलाकारांबरोबर १९१६ मध्ये साताऱ्याजवळील औंध संस्थानचे पंतप्रतिनिधी बाळासाहेब पंत आणि त्यांच्या चित्रकार समूहाची पण नोंद घेता येईल. यांनी काढलेल्या अजिंठा लेणी चित्रप्रतिकृती आजही औंध येथील वस्तुसंग्रहालयात प्रदर्शित केलेल्या पाहावयास मिळतात. सर सय्यद अहमद, रामचंद्रअप्पा बिळगी, प्रा. प्रकाश तांबटकर इत्यादींसह आवर्जून नाव घ्यावे लागेल ज्यांचे नुकतेच निधन झाले त्या चित्रकार एम.आर. पिंपरे यांचे. एम.आर. पिंपरे यांच्या चित्रकारीचे विशेष असे की, सुमारे १५, १६ शे वर्षांपूर्वी ही चित्रे वास्तवात कशी दिसत असतील, तशी काढण्याचा प्रयत्न केला. पिंपरे यांनी आयुष्यभर चित्रसाधना करून भारतात आणि चीन-जपान इ. देशांत सदर चित्रांचे प्रदर्शन भरवून चित्ररसिकांचे मनोरंजन केले. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी आपली कलाकृती मागील काही महिन्यांतच सप्रेम भेट दिली. 

चित्रप्रतिकृतीकारांप्रमाणेच अजिंठा लेणीवर संशोधन करणाऱ्यांचे या अगोदर सविस्तर उल्लेख आलेलेच आहेत. त्याशिवाय औंध संस्थानचे बाळासाहेब पंतप्रतिनिधीचा ‘पोत’ हा सचित्र ग्रंथ आहे. डॉ. एम.के. ढवळीकर यांचे ‘अजंता ए कल्चरल स्टडी’ तसेच प्रस्तुत लेखाच्या लेखनकर्त्याने डॉ.बा.आं.म. विद्यापीठात १९८६-८७ मध्ये ‘हिस्ट्रीग्राफी आॅफ अजंता’ या विषयावर लघुशोधप्रबंध डॉ. पी.व्ही. रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला आहे. डॉ. सुमन पांडे यांनी ‘अजंता के भित्तीचित्रो में अंकित वस्त्र एवं वेशभूषा का अलोचनात्मक अभ्यास’ या शीर्षकाचा शोधप्रबंध बनारस हिंदू विश्व विद्यालयात इ.स. २००२ साली सादर करून २००६ मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित केले आहे. आणखी एक विद्वान बडोदा येथील राजेश सिंग यांनी अजिंठा लेणी अभ्यासाचा ध्यास घेऊन विविधांगी अभ्यास करून भारतभर व्याख्याने देण्याचा शोधनिबंध सादर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर एस.पी.डी.एम. कॉलेजातील चतुरस्र विद्वान प्राध्यापक आबासाहेब देशमुख यांनी ‘अजिंठा लेणी चित्रातून दृग्गोचर होणारे राजकीय सामाजिक व आर्थिक जीवनाचा अभ्यास’ असा विषय घेऊन क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मार्च २०१९ मध्ये, तर बनारस हिंदू विश्व विद्यालयात संशोधक विद्यार्थी शिवप्रसाद यादव यांनी बी.एच.यू.मधील इतिहास विभागाच्या माजी विभागप्रमुख व सध्या प्रोफेसर असलेल्या डॉ. बिंदा परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल २०१९ मध्ये म्हणजे बरोबर दोन शतकांपूर्वी, जॉन स्मिथ, २८ कॅव्हलरी घोडादळातील अधिकारी याने विस्मृतीत गेलेली अज्ञातवासात असलेली अजिंठ्याची लेणी लोकांच्या दृष्टिपथात आणली. त्या घटनेला आज दोनशे वर्षे झाली. त्या औचित्याला अजिंठा लेणीवरील हा शोधप्रबंध सादर करणे हे विशेष.

Web Title: Twenty-two decades of Ajanta caves sighting as a legacy of global culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.