'दोन वेळा कुलगुरू आणि त्यादरम्यान विद्यार्थीही'; जाणून घ्या भुजंगराव कुलकर्णी आणि विद्यापीठाचे नाते, त्यांच्याच शब्दात
By सुमेध उघडे | Published: February 24, 2021 04:44 PM2021-02-24T16:44:21+5:302021-02-24T16:49:00+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university "महाराष्ट्र व्हायचा होता. औरंगाबाद हैदराबाद स्टेटचा भाग होतं. 1958 ला औरंगाबादला विद्यापीठ सुरू झालं. तेव्हा हा आजचा परिसर वगैरे नव्हता. इमारती नव्हत्या. मी त्यावेळी कलेक्टर होतो.
औरंगाबाद : निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे बुधवारी निधन झाले. मराठवाड्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या काळातच औरंगाबाद इथे विद्यापीठाच्या स्थापनेला मान्यता मिळाली. तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठाच्या आणि आता महामानवाचे नाव ल्यालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जन्मकाळातील काही हकीकत भुजंगरावांच्याच शब्दांत...
"महाराष्ट्र व्हायचा होता. औरंगाबाद हैदराबाद स्टेटचा भाग होतं. 1958 ला औरंगाबादला विद्यापीठ सुरू झालं. तेव्हा हा आजचा परिसर वगैरे नव्हता. इमारती नव्हत्या. मी त्यावेळी कलेक्टर होतो. एक दिवस सकाळी सकाळी कुलगुरू डोंगरकेरी माझ्या दारात उभे राहिले. मला घर द्या, म्हणाले. मग आम्ही त्यांची राहायची व्यवस्था केली. विद्यापीठासाठी जागेचा प्रश्न होता. आज जिथे जिल्हा परिषद् आहे, तिथे प्रायमरी स्कूल होतं. त्याला 'फोकानिया' म्हणत. तिथला पसारा हटवुन जागा करून दिली. काही दिवसांनी पंतप्रधान पंडितजी येणार होते. त्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन आम्ही केलं. तिथेच इमारतीच्या मागच्या बाजूला विद्यापीठाच्या उभारणीची कोनशिला त्यांच्या हस्ते बसवली.
काही दिवसांनी मुख्यमंत्री यशवंतराव औरंगाबादला आले. बोलता बोलता त्यांनी विषय काढला, 'विद्यापीठाला जागा पाहताय म्हणे...' मी हो म्हणालो. त्यांनी लगेच ती जागा पाहता येईल का, असं विचारलं. पाहता येईल, पण जीपनं जावं लागेल, असं मी त्यांना सांगितलं. त्या काळात आजच्यासारखे सगळीकडे रस्ते झालेले नव्हते. मोटार जाऊ शकत नव्हती. पण यशवंतराव लगेच तयार झाले. मग काही अंतरापर्यंत मोटार आणि मग जीपमधून आम्ही जागेवर गेलो. त्यांना जागा आवडली. विशेषतः डोंगराने वेढलेला परिसर त्यांनी लांबुन पाहिला. आवडला त्यांना.
सहसा कलेक्टर मुख्यमंत्र्याला फार बोलायचं धाडस करत नाही. पण मी त्यांना म्हणालो, जेमतेम पाच-सहा कॉलेजसाठी तुम्ही विद्यापीठ दिलंय. आता याचे जनक म्हणून तुम्हाला विद्यापीठाचे पिता म्हणू, की आता ममत्व दाखवताय, पुढे पालनही करणार आहात म्हणून विद्यापीठाची माता म्हणू? माणसाचं मोठेपण कसं दिसून येतं बघा, यशवंतराव हसून म्हणाले, 'कुलकर्णी, मला फक्त विद्यापीठाचा मित्र म्हणा.' पुढे जागा झाली. इमारती झाल्या. साठ साली मीही बदलून गेलो.
मी तसा उस्मानिया विद्यापीठाचा ग्रॅज्युएट. तेव्हा मराठवाड्यात एकही सीनियर कॉलेज नव्हतं. एक इंटरमिजिएट कॉलेज फक्त होतं. उस्मानियाचे कुलगुरु राहिलेले नवाब अलियावरजंग महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. विद्यापीठाच्या उभारणीकडे त्यांचं लक्ष होतं. त्यांनी माझ्यात असं काय पाहिलं कोण जाणे, पण ते म्हणत, की तुम्हाला या विद्यापीठाचं कुलगुरु करायचंय. मी नकार द्यायचो. एकदा ते इथं आले होते. सेक्रेटरी त्यांना भेटायला जायचे होते. तेव्हा माझी नेमणूक मराठवाडा विकास महामंडळावर होती. ती संधी दिल्याबद्दल मला त्यांचे आभार मानायचे होतेच. सेक्रेटरींबरोबर मीही गेलो. तेव्हा त्यांनी पुन्हा कुलगुरूपदाचा विषय काढला. पण मला विकास, आर्थिक नियोजन याच विषयात काम करायचं असल्याचं मी सांगितलं. पण तेव्हा कुलगुरुपद रिक्त झालं होतं. गव्हर्नर अलियावरजंग आजारी होते. त्याच आजारपणात पुढे ते वारले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. त्यांना दवाखान्यात पलंगावर पडल्या पडल्याच त्यांनी पुन्हा मला कुलगुरु करण्याचा विषय काढला. पण मी अनुत्सुक असल्याचं वसंतरावांनी त्यांना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, असं. कुलकर्णी नाहीच म्हणतात? मग आपण त्यांना कुलगुरु निवडणाऱ्या समितीचा अध्यक्ष करू. अशा रितीनं मी त्या समितीचा अध्यक्ष झालो. आज इथं असलेले न्यायमूर्ती देशमुख त्या समितीचे सदस्य होते.
पण कालांतराने निवृत्त झालो आणि त्यानंतरच्या दहा वर्षांच्या काळात दोन वेळा या विद्यापीठाचा कुलगुरू होण्याची संधी मला मिळाली. मध्यंतरीच्या काळात मी अकैडमिक कौंसिल, मॅनेजमेंट कौंसिलचा मेंबर वगैरेही होतोच. पण साठीत निवृत्त झालो तेव्हा मी अर्थशास्त्रातून पीएच डीसाठी अर्ज केला होता. तेव्हाचे विभागप्रमुख माझे गाईड होते. 'मराठवाड्याचे आर्थिक नियोजन आणि विकास' हा विषय. पण जेमतेम वर्षभरात बोरीकरांचे निधन झाले. पण विद्यापीठानं मला विनागाईड पीएचडीचे काम सुरु ठेवायची परवानगी दिली.
याच 10 वर्षांच्या काळात मी दोन वेळा कुलगुरु झालो. एकाच काळात मी विद्यापीठाचा विद्यार्थीही होतो आणि कुलगुरुही होतो. अभ्यासही करत होतो. प्रबंध पूर्ण झाला. पण मी तो विद्यापीठाला सादर केला नाही. मीच कुलगुरु असल्यामुळे त्या प्रबंधाचे मूल्यांकन करताना परीक्षक भिडेखातर पार्श्यलिटी करतील. कठोर परीक्षण होणार नाही, असे मला वाटले. म्हणून मी तो प्रबंध तसाच ठेवला. त्याचा ग्रंथ प्रकाशित केला.
तर अशा या माझ्या आठवणी आहेत. विद्यापीठाला आणखी जागतिक पातळीवर नेण्याचे स्वप्न असल्याचे आता कुलगुरूंनी म्हटले. त्यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो. मला बोलावलंत, सत्कार केलात, त्याबद्दल आभार मानतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छांसह माझे दोन शब्द संपवतो.
( डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाने भुजंगराव कुलकर्णी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तेव्हा त्यांनी केलेल्या भाषणाचा अंश. संदर्भ - सोशल मिडिया - संकेत कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट )