अभ्यासात पुढे असल्याच्या द्वेषातून जुळ्या भावाचा हातोडी मारून केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 07:33 PM2019-02-27T19:33:36+5:302019-02-27T19:39:34+5:30

आई, तसेच शाळेतील शिक्षक आणि गल्लीतदेखील मोठ्या भावाचीच वाहवा करतात या द्वेषातून केला खून

twin brother kills brother due poor in study | अभ्यासात पुढे असल्याच्या द्वेषातून जुळ्या भावाचा हातोडी मारून केला खून

अभ्यासात पुढे असल्याच्या द्वेषातून जुळ्या भावाचा हातोडी मारून केला खून

googlenewsNext
ठळक मुद्देदोघे जुळे यंदा दहावीची परीक्षा देणार होतेवृत्तपत्र विकून आई चालवीत होती संसारअभ्यासात मागे असल्याने लहानग्याच्या मनात होती ईर्षा

औरंगाबाद : सर्व जण त्याचेच गुणगाण गातात, तो अभ्यासातही हुशार आहे. मला कुणीच चांगले म्हणत नाही, या भावनिक द्वंद्वातून ईर्षेने झपाटलेल्या भावाने जुळ्या भावाचा डोक्यात हातोडी मारून खून केल्याची सनसनाटी घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कैलासनगरातील गल्ली नं. १ येथे घडली. दोघेही अल्पवयीन (वय १६ वर्षे) असून, यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसले होते. 

आई, तसेच शाळेतील शिक्षक आणि गल्लीतदेखील मोठ्या भावाचीच वाहवा होते. माझी नाही, म्हणून लहानग्याच्या मनात ईर्षा निर्माण झाली होती. अभ्यासात मागे असल्यामुळे त्याच्यावर घरातील किरकोळ कामे सोपविली जायची. त्याचाही त्याला सतत राग येत असे. त्यांची आई मंगळवारी बाहेरगावी गेली होती. सायंकाळी ४ वाजता नळास पाणी आले होते. त्याने पाणी भरले तेव्हा मोठा पलंगावर झोपला होता. त्यामुळे रागाच्या भरात घरातील हातोडी घेऊन त्याने झोपलेल्या भावाच्या डोक्यावर जोरदार घाव घातले. त्यातच तो निपचित पडला. 

अंगावरील रक्ताच्या शिंतोड्याने उलगडले गूढ
भावाचा खून करून लहान भावाने दरवाजा बंद केला व तो घराबाहेर पडला. तासाभरानंतर पुस्तके घेऊन घरी आला. दरवाजा उघडून त्याने आरडाओरड सुरू केला. काका तसेच  गल्लीतील नागरिकांना जमा केले. भाऊला काय झाले ते बघा, असे नाट्य तो रंगवू लागला. नागरिक व पोलीस घटनास्थळाची पाहणी आणि विचारपूस करीत असताना तो घटनास्थळावरून दूर एका शिकवणीसमोर जाऊन उभा राहिल्याची माहिती मिळाली. त्याला पोलिसांनी बोलावून विचारपूस केली. बारकाईने त्याचे निरीक्षण केले असता त्याच्या अंगावर, केसावर रक्ताचे शिंतोडे दिसत होते. नंतर पोलिसांनी विचारणा करताच त्याने खून केल्याची कबुली दिल्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी सांगितले.

पलंग व भिंतीवर उडाले रक्त
द्वेषाने भान हरपलेल्या लहान भावाने मोठ्या भावाचा क्षणार्धात काटा काढला. त्याच्या जोरदार घावाने भावाचे कपाळमोक्ष होऊन रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर उडाल्या. गादीवरदेखील रक्ताचा सडा पडलेला होता. हे दृश्य पाहून दोघांशिवाय कोणी घरात तिसरे होते का, याची विचारपूस केली तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. 

हातोडी धुऊन ठेवली
रागाच्या भरात भावाला संपविल्यानंतर रक्ताने माखलेली हातोडी त्याने धुऊन ठेवली होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार मृताच्या डोक्यात हातोडीचे चार वार असून, एक पाठीत आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी पुरावे गोळा करण्याचे काम केले. त्या हातोडीला रक्ताचे डाग आढळून आले असून, घटनास्थळी पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त व गुन्हे शाखेच्या पथकाने भेट दिली. आई गावी गेल्याची संधी साधून रागाच्या भरात त्याने खून केला, असे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर यांनी सांगितले. याप्रकरणी उशिरापर्यंत जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. 

दोघांत तासाभराचे अंतर
या जुळ्यांचे वडील रिक्षाचालक होते. दहा वर्षांपूर्वी आजाराने त्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून आईने पुस्तके व पेपर विक्री करून दोघांचा सांभाळ केला. १० फेब्रुवारी २००३ रोजी हे जुळे जन्मले. त्यातील मृत हा आरोपी लहानग्यापेक्षा एक तासाने मोठा होता. हा प्रकार घडला तेव्हा त्यांची आई नातेवाईकाच्या लग्नानिमित्त बाहेरगावी गेली होती.

१० फेब्रुवारीला साजरा केला वाढदिवस 
या जुळ्या भावांनी १० फेब्रुवारीला गल्लीत धूमधडाक्यात वाढदिवस साजरा केला होता. गुजराती हायस्कूलमध्ये दोघेही दहावीत शिकत होते. जुळे असल्याने आनंदात वाढदिवस साजरा केल्याची चर्चा गल्लीतील नागरिकांत होती; परंतु दोघांत कधीही भांडण झाल्याचे दिसले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे होते.

२४ वर्षांनंतर झाले होते जुळे
या मुलांची मावशी रामनगरात राहते. तिला घटनेची माहिती कळताच ती धावत आली आणि समोरचे दृश्य पाहून हंबरडा फोडला. २४ वर्षांनंतर बहिणीला जुळी मुले झाली होती. नवरा मेल्यावर तिने पोटाला चिमटा घेत तळहाताच्या फोडासारखे मुलांना वाढविले होते. असे म्हणत, हे कसे झाले, म्हणून ती ओक्साबोक्सी रडत होती. दरम्यान मुलाची आई रात्री उशिरा गावाहून घरी आली. बुधवारी  शवविच्छेदन होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: twin brother kills brother due poor in study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.