दोन फरार अधिकाऱ्यांना अटक
By Admin | Published: August 26, 2015 12:36 AM2015-08-26T00:36:43+5:302015-08-26T00:46:33+5:30
जालना : येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा व्यवस्थापकासह दोघांविरूद्ध २३ एप्रिल
जालना : येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी जिल्हा व्यवस्थापकासह दोघांविरूद्ध २३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार महिन्यांपासून फरार असलेल्या या दोन्ही आरोपींना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सोमवारी सायंकाळी ५ वाजता अटक केली होती. दरम्यान, मंगळवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जालना येथील अण्णा भाऊ साठे विकास महामंडळात १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात जिल्हा व्यवस्थापक मधुकर बापूराव वैद्य व लिपीक अशोक एकनाथ खंदारे यांनी संगनमत करून महामंडळाच्या ८ कोटी ५७ लाख ८८६ रूपयाच्या निधीचा अपहार केल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर महामंडळाचे औरंगाबाद परिक्षेत्राचे प्रादेशिक व्यवस्थापक अनिल म्हस्के यांनी २३ एप्रिल रोजी कदीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर जिल्हा व्यवस्थापक वैद्य व कर्मचारी खंदारेविरूद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच हे दोघेही फरार झाले आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
दरम्यान, जालन्यातील महामंडळाच्या कार्यालयाप्रमाणे राज्यातील इतर काही जिल्हा कार्यालयात अपहार झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच महामंडळाचे तत्कालीन चेअरमन आ. रमेश कदम यांच्याविरूद्धही मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याने या प्रकरणाचा तपास राज्य शासनाने सीआयडीकडे दिला आहे. त्यानुसार जालना येथील प्रकरणाचा तपास २३ जुलै रोजी कदीम जालना पोलिसांकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. सीआयडीकडे तपास येऊनही हे दोन्ही आरोपी फरार होते. अखेर चार महिन्यांनंतर २४ आॅगस्ट रोजी व्यवस्थापक मधूकर वैद्य याला बीड येथून, तर लिपीक खंदारे याला जालन्यातूनच अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांंगितले. या दोघांना अटक केल्याची नोंद कदीम जालना पोलिस ठाण्यात घेवून त्यांना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या लॉकअप मध्ये रात्रभर ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी ११.३० वाजता या दोघांनाही सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सदर बाजार पोलिस ठाण्याच्या लॉकअप मधून न्यायालयात हजर करण्यासाठी नेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असल्याची माहिती कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वाय.ए. गावडे यांनी दिली.