दोन एजंट ताब्यात
By Admin | Published: June 13, 2014 11:44 PM2014-06-13T23:44:06+5:302014-06-14T01:19:29+5:30
परभणी : तीन महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पीएस पीएस इंडिया मल्टीट्रेड कंपनीच्या आणखी दोन
परभणी : तीन महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या पीएस पीएस इंडिया मल्टीट्रेड कंपनीच्या आणखी दोन एजंटांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींना १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीएस पीएस इंडिया मल्टीट्रेड कंपनीमार्फत दामदुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखविले जात होते. कंपनीच्या प्रवक्त्यांनी अनेक एजंटही नेमले होते. या एजंटांना भरमसाठ पैसे दिले जात. पुणे, औरंगाबाद, लातूर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, बीदर, सोलापूर आदी ठिकाणी या कंपनीचे जाळे पसरविण्यात आले. शहरातील वैभवनगर भागात एक कार्यालयही उघडण्यात आले होते. परंतु मागील दोन महिन्यांपासून गुंतवणूकदारांना कोणताही परतावा न देता कंपनीच्या संचालक मंडळाने परभणी, पुणे व औरंगाबाद येथील कार्यालये बंद केले. त्यानंतर गुंतवणूकदारांनी परभणी येथील कार्यालयास खेटा मारण्यास प्रारंभ केला. त्यातूनच मानवत तालुक्यातील नागरजवळा येथील कृष्णा ज्ञानोबा होगे यांनी कंपनीविरुद्ध नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनी या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्याकडे सोपविला. स्थागुशाने गतीने तपास करीत रविकुमार मुरलीधर राठोड आणि आनंद उत्तमराव वाघमारे या दोन एजंटांना अटक केली. त्यानंतर याच प्रकरणातील प्रकाश नामदेव राठोड (रा.मसला तांडा पाथरी) आणि पंडित गोपीनाथ चव्हाण (रा.टाकळगव्हाण ता.पाथरी) यांना ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही एजंट गावोगाव फिरुन लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडत होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)पोलिसांचे आवाहन
पीएस पीएस इंडिया मल्टीट्रेड कंपनीकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी केले आहे.
लाखोंचा अॅडव्हांस
कंपनीने नेमलेले एजंट गावोगाव फिरुन लोकांना कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडत असे. प्रत्येक महिन्याला या एजंटांची बैठक होत होती. या बैठकीत कंपनीच्या नवनवीन योजना एजंटांना सांगितल्या जात व जास्तीत जास्त पद्धतीने कशा पद्धतीने साखळी निर्माण करायची हे सुद्धा बैठकीत शिकविले जात असे. त्यांना यासाठी लाखो रुपये अॅडव्हांस म्हणून दिले जात असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
दस्तावेज हस्तगत
पंडित गोपीनाथ चव्हाण यास ४६ हजार ६८८ रुपये व प्रकाश नामदेव राठोड यास ४ लाख ५० हजार रुपये देण्यात आल्याचे दस्तावेज स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केले आहेत.