अडीच वर्षांचा चिमुकला आता सक्षमपणे चालेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 12:19 AM2019-01-03T00:19:31+5:302019-01-03T00:20:32+5:30
अडीच वर्षांचा चिमुकला चालताना अचानक तोल जाऊन पडत होता. नेमके काय झाले, हे आई-वडिलांनीही कळत नव्हते. अखेर डॉक्टरांना दाखविले तेव्हा मेंदूजवळ गाठ असल्याचे निदान झाले. पाच तासांच्या शस्त्रक्रियेत गाठ पूर्णपणे काढण्यात डॉ. भावना टाकळकर यांना यश आल्याने चिमुकल्याला नवीन आयुष्य मिळाले. तो आता सक्षमपणे चालू लागेल, असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला.
औरंगाबाद : अडीच वर्षांचा चिमुकला चालताना अचानक तोल जाऊन पडत होता. नेमके काय झाले, हे आई-वडिलांनीही कळत नव्हते. अखेर डॉक्टरांना दाखविले तेव्हा मेंदूजवळ गाठ असल्याचे निदान झाले. पाच तासांच्या शस्त्रक्रियेत गाठ पूर्णपणे काढण्यात डॉ. भावना टाकळकर यांना यश आल्याने चिमुकल्याला नवीन आयुष्य मिळाले. तो आता सक्षमपणे चालू लागेल, असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला.
हिंगोली येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलावर ही शस्त्रक्रिया झाली. एमआरआय तपासणीत मेंदूत गाठ असल्याचे निदान झाले. डोक्यात मोठ्या मेंदूच्या खाली आणि लहान मेंदूजवळ साडेसहा बाय सहा सेंटीमीटरची कर्करोगाची गाठ होती. ही गाठ पूर्णपणे काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती. त्यासाठी आई-वडिलांनी होकार दिला. अॅपेक्स हॉस्पिटलमध्ये डॉ. भावना टाकळकर यांनी गुंतागुंतीची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी केली. अत्याधुनिक यंत्राच्या मदतीने गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. प्रदीप राठोड यांचे सहकार्य मिळाले. ही गाठ होण्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. शिवाय कुटुंबातही असा कधी कोणाला प्रकार झालेला नाही. शस्त्रक्रियेच्या अवघ्या १५ दिवसांनंतर हा चिमुकला तपासणीसाठी आला होता. तो आता चांगला झाला, तोल जाऊन पडणार नाही, हे सांगताना त्याच्या आईचे डोळे पाणावले होते.
प्रमाण अगदी कमी
डोक्यामध्ये अशी गाठ होण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. गाठीमुळे चालता न येणे, तोल जाणे असे प्रकार होतात. ही गाठ शस्त्रक्रियेने पूर्णपणे निघाली आहे. त्यामुळे सदर मुलगा चालण्यास सक्षम होईल, असे डॉ. भावना टाकळकर यांनी सांगितले.