दंड चुकविण्यासाठी दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारे दोन जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 12:40 PM2021-05-14T12:40:17+5:302021-05-14T12:42:10+5:30
महावीर चौकात आणि सिडको एन १ येथे दोन घटनेत दोघे अटकेत
औरंगाबाद : पोलिसांचा दंड चुकविण्यासाठी मोटारसायकलवर बनावट क्रमांक टाकून फिरणाऱ्या दोन जणांना वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी अटक केली.
वेदांतनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल भदरगे आणि कर्मचारी १२ मे रोजी दुपारी महावीर चौकात नाकाबंदी करीत होते. यावेळी संशयावरून पोलिसांनी दुचाकीचालक अक्षय पुरुषोत्तम खंदारे यास अडवले. तेव्हा त्याच्या दुचाकीवरील क्रमांक (एमएच २० एडी ४७९२) असा होता. पोलिसांनी मोटार वाहन चलन मशीनच्या साहाय्याने या क्रमांकाच्या गाडीमालकाचे नाव पाहिले. याविषयी आरोपीकडे विचारपूस करताच तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने पोलिसांचे चलन भरावे लागू नये याकरिता दुचाकीवर बनावट क्रमांक टाकल्याची कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक भदरगे यांनी आरोपी अक्षयविरुध्द क्रांती चौक ठाण्यात सरकारतर्फे गुन्हा नोंदविला.
अन्य एका घटनेत सिडको एन १ येथे वाहतूक शाखेचे हवालदार राजू पचराके हे १२ मे रोजी सकाळी ११ वाजता नाकाबंदी करीत होते. यावेळी आरोपी सचिन सिध्दार्थ साळवे या दुचाकीचालकाला अडविले. संशयावरून त्याची दुचाकी कुणाच्या नावे आहे असे त्याला विचारले असता त्याला नाव सांगता आले नाही. पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावल्याने दुचाकीवरील क्रमांक बनावट असल्याचे समोर आले. त्याने पोलिसांना चुकवण्यासाठी बनावट क्रमांक टाकल्याची कबुली दिली. याविषयी हवालदार राजू यांनी आरोपी सचिनविरुध्द पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी त्याला अटक केली.