गतिमंद महिलेवर अत्याचार करणारे दोघे अटकेत; २ महिन्यांपासून होते फरार
By दिपक ढोले | Published: March 25, 2023 04:47 PM2023-03-25T16:47:30+5:302023-03-25T16:47:40+5:30
एका आरोपीस यापूर्वीच अटक करण्यात आली आहे
जालना : एका गतिमंद महिलेवर अत्याचार करून फरार झालेल्या दोघा संशयितांना पिंक मोबाईल पथकाने शनिवारी अटक केली. राजू तुकाराम अनपट (वय ३५) व किसन गणपत मुळे (५२) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पिंक मोबाईलच्या एपीआय अर्चना पाटील यांनी दिली.
तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका मतिमंद महिलेवर गावातीलच तिघांनी वारंवार अत्याचार केला होता. त्यामुळे सदर महिला गर्भवती राहिली. सुरुवातीला या प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींवर ६ फेब्रुवारी २०२३ रोजी तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासात गावातीलच तिघांची नावे निष्पन्न झाली. यातील संशयित सखाराम संजय म्हस्के (५०, रा. थेरगाव) याला पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी अटक केली होती; तर संशयित राजू तुकाराम अनपट (३५) व किसन गणपत मुळे (५२) हे फरार झाले होते. दरम्यान, पोलिस मागील दोन महिन्यांपासून त्यांचा शोध घेत होते.
खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पिंक मोबाइल पथकाने किसन मुळे याला गावातूनच, तर राजू अनपट यास चनेगाव (ता. बदनापूर) येथून अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती एपीआय अर्चना पाटील यांनी दिली.