बनावट नावाने महागडे पार्सल मागवून वस्तू बदलणाऱ्या दोघांना बेड्या
By राम शिनगारे | Published: June 23, 2024 08:44 PM2024-06-23T20:44:14+5:302024-06-23T20:44:26+5:30
अमॅझॉन कंपनीची ११ लाखांची फसवणूक : दोन्ही आरोपींना कर्मचाऱ्यांनीच पकडले
छत्रपती संभाजीनगर : अमॅझॉन कंपनीकडून महागड्या वस्तू मागवून बनावट नावाने खोट्या पत्त्यावर मागवयाच्या, त्यातील वस्तू बदलून काही तरी कारण दाखवत कंपनीच्या डिलिव्हरी बॉयकडे पार्सल परत पाठवून कंपनीची फसवणूक करणाऱ्या ठाण्यातील दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच सापळा रचून पर्दाफाश करीत उस्मानपुरा पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
नौमान नौशाद मुल्ला (२४) आणि नुर शेख शहजाद (२४, दोघे ही रा. मुंब्रा, ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अमॅझॉन कंपनीचे व्यवस्थापक मंगेश कान्हे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २१ जुन रोजी सकाळी कामगार ज्ञानेश्वर कळम यांच्याकडे दोन पार्सल दिले होते. त्या पार्सलमध्ये १० लाख ९६ हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक टोस्टर साहीत्य होते. हे पार्सल अतुल आणि संजय अशा अपुर्ण नावाने होते. तसेच दोन्हीवर जांबीदा प्राईम, न्यु उस्मानपुरा असा एकच पत्ता होता.
कर्मचारी दिलेल्या पत्त्यावर जाऊन संबधीत क्रमांकावर कॉल केला असता पार्सल घेण्यासाठी दोन तरुण आले. त्यापैकी एका तरुणाने पार्सल घेतले तर दुसरा तरुण कळम यांच्याशी बोलत उभा राहीला. काही वेळाने पार्सल नेलेल्या तरुणाने पार्सल परत आणून देत माझा मोबाईल बंद असून तुमच्या कंपनीकडून आलेला ओटीपी देता येणार नाही, तुम्ही उद्या या असे सांगितले. यामुळे कळम यांनी पार्सल कंपनीच्या गोडावूनमध्ये आणुन जमा केले. दुसऱ्या दिवशी कंपनीच्या पुणे येथील कार्यालयातून तक्रारदार कान्हे यांना कॉल आला.
त्यांनी दोन्ही पार्सलची माहिती घेत त्यावर एकच पत्ता आणि नाव अपुर्ण असल्याचे सांगत, यापुर्वी देखील परत आलेल्या पार्सलमध्ये दुसऱ्या वस्तु निघाल्यामुळे हे पार्सल तपासून घेण्याबाबत सुचना केल्या. कान्हे यांनी पार्सल तपासले असता या पार्सलवर जुनी चिठ्ठी आणि आतमध्ये कंपनीने पाठवलेल्या इलेक्ट्रीक टोस्टर ऐवजी निकृष्ट दर्जाचे मिक्सर निघाले. त्यावरून फसवूणक झाल्याचे स्पष्ट झाले.
अमॅझॉनच्या कर्मचाऱ्यांनी रचला सापळा
ग्राहक असलेल्या दोघांनी वस्तू घेऊन दुसऱ्या दिवशी बोलावले होते. त्यानुसार कळम हे वस्तु घेऊन गेले. त्याचवेळी अमॅझॉनच्या इतर कर्मचाऱ्यांनी कळम यांच्या पाठिमागचे थांबवण्याचा निर्णय घेतला. फसवणूक करणारे दोघे वस्तू घेण्यासाठी येताच तीन जणांनी झडप घालुन पकडले. त्यानंतर उस्मानपुरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी गुन्हा नोंदवून दोघांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक विनोद अबुज करीत आहेत.