भाजीपाला विक्रेत्याला लुटणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 07:59 PM2019-03-27T19:59:41+5:302019-03-27T20:00:28+5:30
पीन नंबर सांगण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.
औरंगाबाद : पुंडलिकनगर रस्त्यावरील एका एटीएम सेंटरमधून बाहेर पडलेल्या भाजीपाला विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील दीड हजार रुपये बळजबरीने काढून घेणाऱ्या त्रिकुटांपैकी दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या पाच तासांत बेड्या ठोक ल्या. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून, त्यांच्याकडून लुटमारीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
शेख इम्रान शेख लाल(२२), शेख इरफान शेख लाल(वय २५,दोघे रा. गारखेडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचा तिसरा साथीदार पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, हनुमाननगर येथील रहिवासी अमोल रमेश दिवटे (२४)हा तरूण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अमोल पुंडलिकनगर रस्त्यावरील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. तांत्रिक कारणामुळे एटीएममधून पैसे न निघाल्याने ते सेंटरमधून बाहेर पडले.
त्याचवेळी एटीएम सेंटरपासून काही अंतरावर ते चालत असताना त्यांचा पाठलाग क रून आलेल्या तीन जणांनी त्यांना अडविले. त्यांच्यापैकी दोन जणांनी त्यांच्या हात धरले तर तिसऱ्याने त्यांच्या गळ्याला चाकू लावून खिशातील पाकीट काढून घेतले. भाजीपाला विक्रीतून आलेले सुमारे साडेसतराशे रुपये आणि एटीएम कार्ड पाकिटमध्ये होते. हे पैसे पाहिल्यानंतर एटीएममधून काढलेले पैसे कुठे असे आरोपींनी अमोलला विचारले. त्यावेळी पैसे निघालेच नसल्याचे तो म्हणाला. मात्र आरोपींचा त्याच्यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याचा एटीएम कार्डचा पीन नंबर मागितला. मात्र अमोल पीन नंबर सांगण्यास नकार दिल्याने आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.
यावेळी अमोलने आरडाओरड केल्यानंतर ते तेथून पळून गेले. पुंडलिकनगर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यावेळी र उपायुक्त डॉ.राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, कर्मचारी शिवाजी गायकवाड, जालिंदर मांटे आणि इतर हे कोम्बिग आॅपरेशन राबवित होते. पोलिसांनी तपास करून पहाटे पाच वाजता इम्रान आणि इरफान यांना गारखेडा सुतगिरणी चौकात पकडले.