पेट्रोल-डिझेलची अवैधरीत्या विक्री करणारे दोघे जण अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:02 AM2021-09-06T04:02:17+5:302021-09-06T04:02:17+5:30
शिऊर : पेट्रोल व डिझेलने भरलेल्या कॅन कारमध्ये ठेवून अवैधरीत्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कारसह दोघांच्या मुसक्या शिऊर ...
शिऊर : पेट्रोल व डिझेलने भरलेल्या कॅन कारमध्ये ठेवून अवैधरीत्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या कारसह दोघांच्या मुसक्या शिऊर पोलिसांनी आवळल्या आहेत. मात्र, एक जण त्या ठिकाणावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याची घटना वैजापूर तालुक्यातील दसकुली शिवारात शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सपोनि. नीलेश केळे हे आपल्या सहकाऱ्यांसह अवैध धंद्याची माहिती काढून रेड कामी खासगी वाहनाने जात होते. नागवाडी फाट्याजवळ असताना शनिवारी (दि.४) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, दसकुली गावातील तलावाजवळ कारमध्ये पेट्रोल व डिझेलने भरलेल्या कॅन असून येथून ठिकाणावरून निघणार आहे. माहिती मिळताच सपोनि. नीलेश केळे, पोउपनि. अंकुश नागटिळक, अविनाश भास्कर, अमोल मगर, गणेश गोरक्ष, अमोल कांबळे यांनी पंचांसह माहितीच्या ठिकाणी छापा मारला.
तेव्हा कारची (क्र. एमएच१४ सीके ९६६०) तपासणी केल्यानंतर २० लीटर डिझेलने भरलेल्या चार कॅन व ३५ लीटरचा एक कॅन एकूण ११५ लीटर डिझेल व २० लीटरची पेट्रोलने भरलेली कॅन असा १३ हजार ९८० रुपयांचे इंधन पकडण्यात आले. तर १० लाख किमतीची कार पोलिसांनी ताब्यात घेतली. किशोर शंकर जाधव (३२, रा. दसकुली) व गणेश भानुदास जाधव (२३, रा. लोणी) या दोघांना अटक केले. तर अंधाराचा फायदा घेत सूरज निकम (रा. चिकटगाव) हा कारची चावी घेऊन फरार झाला. दरम्यान, ट्रॅक्टरच्या साहाय्याने कार पोउपनि. अंकुश नागटिळक यांच्या फिर्यादीवरून शिऊर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.