दोन दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:06 AM2017-10-29T00:06:55+5:302017-10-29T00:07:02+5:30
येथील परळी व परभणी रोडवरील आखाड्यावर धुमाकूळ घालून मजुरांना मारहाण करणाºया चोरी प्रकरणात पोलिसांना शनिवारी दोन दुचाकी आणि रक्ताने माखलेली एक काठी सापडली आहे. दोन पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : येथील परळी व परभणी रोडवरील आखाड्यावर धुमाकूळ घालून मजुरांना मारहाण करणाºया चोरी प्रकरणात पोलिसांना शनिवारी दोन दुचाकी आणि रक्ताने माखलेली एक काठी सापडली आहे. दोन पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.
२६ आॅक्टोबर रोजी ९.३० ते १० वाजेच्या सुमारास परळी रोडवरील समद जिनिंगच्या पाठीमागे असलेल्या विनायक महाजन यांच्या शेत आखाड्यावर धुमाकूळ घालत चोरट्यांनी बबन मोरे, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा आकाश यांना मारहाण केली होती. तसेच परभणी रोडवरील संत जनाबाई मंदिर परिसरातील लव्हाळे, डहाळे यांच्या शेत आखाड्यावर चोरी केली. या चोरांच्या धुमाकुळानंतर पोलिसांनी रात्रभर तपास केला. परंतु, चोरटे मिळून आले नाहीत. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चौधरी पेट्रोलपंपाकडे धाव घेतली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे, राहुल बहुरे, मोईनोद्दीन पठाण, जमादार रंगनाथ देवकर, आनंद जोगदंड, सुग्रीव कांदे हे पोलीस कर्मचारी प्रसाद जिनिंग परिसरात आले. तेव्हा रस्त्याच्या कडेला एम.एच.२२ -एबी ४८५ आणि एम.एच.२३-एए ८७५५ या क्रमांकाच्या दोन दुचाकी उभ्या होत्या. पोलिसांना संशय आल्याने गाडी थांबवीताच दबा धरुन बसलेले चोरटे पसार झाले. या परिसरात रक्ताने माखलेली एक काठीही सापडली आहे. दरम्यान, चोरांच्या शोधासाठी डीवायएसपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब मगरे, रवि मुंडे यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत.