संधी साधून अट्टल गुन्हेगाराने महिलेचे दागिने पळवले; दोघांनी धाडसाने त्याला लोळवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:23 PM2023-01-23T18:23:59+5:302023-01-23T18:25:24+5:30
सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढताना समोरून आलेल्या दोघांनी मोठ्या धाडसाने चोरट्यास पकडले
कन्नड (औरंगाबाद) : हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमास जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्यास युवकांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज सकाळी ११ वाजता धुळे-सोलापूर मार्गावर घडली. रजनीकांत पुंजाराम त्रिभुवन असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बारामती अॅग्रोच्यावतीने सोमवारी सकाळी ११ वाजता गजानन हेरिटेज येथे महिलांसाठी हळदीकुंकू आणि संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शहरातील शितलमाता गल्लीतील रहिवाशी द्वारकाबाई रत्नाकर वाघचौरे ( ५५ ) या दोन महिलांसह जात होत्या. सोलापुर - धुळे या जुन्या राष्ट्रीय महामार्गावरून जाताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या रजनीकांत पुंजाराम त्रिभुवन याने द्वारकाबाईंच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाचे दागिने ओडून पळ काढला.
दरम्यान, द्वारकाबाईंनी आरडाओरड केल्याने समोरून येणाऱ्या सोमेश्वर काळे व कमलेश कदम यांनी चोरट्यास पकडले. घटनेची माहिती मिळताच सपोनि दिनेश जाधव, पोउपनि. भूषण सोनार आणि पोकॉ कुलकर्णी, बर्डे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रजनीकांत त्रिभुवन यास चोरीचा ऐवज आणि विनाक्रमांकाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.
याप्रकरणी द्वारकाबाई वाघचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजनीकांत पुंजाराम त्रिभुवन ( २४ ) हा वैजापूर येथील रहिवाशी आहे. आरोपींविरुद्ध लुटमारीचे विविध ठिकाणी चार गुन्हे दाखल असल्याची माहिती सपोनि. दिनेश जाधव यांनी दिली.