दुचाकीला धक्का लागल्याने दोघा भावांना बेदम मारहाण; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 03:03 PM2018-11-28T15:03:36+5:302018-11-28T15:06:28+5:30
चाकीचा धक्का लागल्याने शाब्दिक चकमक होऊन दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आली.
औरंगाबाद : पुंडलिकनगर येथे रविवारी रात्री दुचाकीचा धक्का लागल्याने शाब्दिक चकमक होऊन दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुनील बाबूराव मुंडलिक (३५, रा. पुंडलिकनगर) याचा मृत्यू झाला, तर संदीप बाबुराव मुंडलिक (३३) हा गंभीर जखमी आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे पुंडलिकनगर ठाण्यात मंगळवारी सकाळी जमाव जमला. नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकारदिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी मनोज जाधव (रा. हनुमाननगर) आणि टिपू शेख याच्यासह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पुंडलिकनगर रोडवरील समर्थ कमानीजवळ दुचाकीवरून स्वामी समर्थ कमानीकडे वळण घेत असताना मुंडलिक बंधूच्या वाहनाचा मनोज जाधव याच्या मोटारसायकलला धक्का लागला. यावेळी मुंडलिक बंधू आणि जाधव यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी टिपू आणि त्याचे इतर साथीदार तिथे आले आणि जाधव, टिपूसह सहा ते सात जणांनी मुंडलिक बंधूंना बेदम मारहाण केली. आरोपींनी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर आरोपी पसार झाले. रात्री अकरा वाजेपर्यंत हा गोंधळ चालू होता.
रात्री अकरा वाजेनंतर सुनील आणि संदीप हे दोघेही घरी जाऊन झोपले. झोपेतच सुनील बेशुद्ध झाला. सोमवारी सकाळी सहा वाजता सुनील बेशुद्धावस्थेत असल्याचे घरच्या मंडळींना लक्षात आले. त्यानंतर त्याला उपचारासाठी सुरुवातीला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करेपर्यंत दोघांनीही मारहाण झाल्याची माहिती कुटुंबियांना दिलीच नव्हती. एमजीएममध्ये उपचार चालू असताना प्रकृती अधिकच खालावल्याने सुनीलला घाटी रुग्णालयात सायंकाळी सात वाजता दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. सोमवारी सायंकाळी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनीलच्या डोक्याला मार लागला होता, तसेच संदीपच्या पाठीवरही मारहाणीचे व्रण उमटले होते. सुनीलच्या डोक्याला मार कसा लागला याची नातेवाईकांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर संदीपने रविवारी रात्री मारहाण झाल्याची माहिती कुटुंबियांना दिली.
पोलीस ठाण्यात गोंधळ
सोमवारी सकाळी सुनीलचे कुटुंबीय आणि नातेवाईक पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आले आणि दोघा भावांना मारहाण करणाऱ्या टोळक्याला अटक करण्याची, तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावेळी नातेवाईकांनी गुन्हेगारांना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. कुटुंबियांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला. सायंकाळपर्यंत या ठिकाणी वातावरण तंग होते. दरम्यानच्या काळात सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र गायकवाड, निरीक्षक एल.ए. शिनगारे यांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचे आश्वासन कुटुंबियांना दिले. त्यामुळे थोडाफार तणाव निवळला. त्यानंतर सायंकाळी सुनील यांची पत्नी आणि काही नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
टिपू मकोकातील आरोपी
मारहाण करणारा टिपू शेख हा कुख्यात गुन्हेगार आहे. मकोका कायद्यानुसार त्याच्यावर खंडणी, प्र्राणघातक हल्ले करणे आदी कारणांवरून कारवाई करण्यात आली होती. दीड महिन्यापूर्वीच तो हर्सूल कारागृहातून बाहेर आला होता.
मृत सुनील इलेक्ट्रिशियन
मृत सुनील हे इलेक्ट्रिशियनचे काम करीत होते. दोघे बंधू रविवारी रात्री गजानन महाराज मंदिर चौकात काही कामासाठी बाहेर पडले होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हल्ल्याची घटना घडली. सुनील यांच्या पश्चात पत्नी, सात वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा, असा परिवार आहे.