शेतीच्या वादामुळे दोन भाऊ मुकले आई-वडिलांना; दोघांच्या भांडणाला कंटाळून संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 04:13 PM2022-05-04T16:13:28+5:302022-05-04T16:15:40+5:30
दोघा मुलांचे भांडण गोरखनाथ व लताबाई यांना सहन होत नव्हते. मुलेही ऐकत नव्हती, त्यामुळे त्यांनी कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.
- बाबासाहेब धुमाळ
वैजापूर (औरंगाबाद): शेती व संपत्तीचा भावा-भावातील वाद हा सगळीकडे कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. मात्र या वादामुळे जन्मदात्या आई-वडिलांची काय अवस्था होत असते, याकडे कोणी लक्ष देत नाहीत. काबाडकष्ट करून जपलेली शेती व संपत्ती व त्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलेली मुले यामुळे कोंडीत सापडलेल्या खंडाळा येथील वृद्ध दाम्पत्याने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मुलांच्या शेतीचा वाद कधीतरी थांबेल; परंतु त्यांना पुन्हा कधीही आपले आई-वडील दिसणार नाहीत. ही खंत त्यांना जीवनभर राहील.
खंडाळा येथील गोरखनाथ हरिचंद्र गाडेकर (५७) व त्यांची पत्नी लताबाई (५७) या दाम्पत्याला ज्ञानेश्वर व गणेश ही दोन मुले व दोन मुली आहेत. दोघाही पती, पत्नींनी काबाडकष्ट करून संसाराचा गाडा हाकला. सर्व मुलांचे लग्न झाले. यानंतर दोन्ही मुले वेगळी झाली. गोरखनाथ यांना १८ एकर शेती होती. त्यापैकी सात एकर शेती गणेश व आठ एकर शेती ज्ञानेश्वर यांच्या नावावर वाटणी करून दिली होती. उर्वरित जमीन ही गोरखनाथ यांच्या नावावर होती. गोरखनाथ व लताबाई हे दोघेही लहान मुलगा ज्ञानेश्वरमध्ये राहत होते. ज्ञानेश्वर याने वर्षभरापूर्वी त्यांची आत्या मंदाबाई सुखदेव महालकर यांची सात एकर जमीन विकत घेतली. मात्र ही जमीन गणेश सात ते आठ वर्षांपासून बटाईने करीत होता. येथेच खरी दोघा भावात वादाची ठिणगी पडली होती.
दोघा भावात जमिनीवरून वाद सुरू झाला. यावरून ते नेहमी भांडत असत. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचले होते. या भांडणाचा त्रास मात्र गोरखनाथ व लताबाई यांना होत होता. अनेकवेळा समजावून सांगूनही मुले ऐकत नव्हती. गावात तसेच नातेवाईकांतही आपली बदनामी होत असल्याने गोरखनाथ व लताबाई चिंतेत होते. ज्ञानेश्वरने नवीन घेतलेल्या जमिनीत कांद्याची लागवड केली होती. हे कांदे गणेश हा परस्पर काढून नेत होता. यावरून दोघा भावात वाद होऊन दोन दिवसांपूर्वी तुंबळ हाणामारी झाली होती. गणेशने काठीने मारहाण करून ज्ञानेश्वरला जखमी केले होते. या प्रकरणी गणेशविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे गोरखनाथ व लताबाई तणावात होते.
साडूला फोनवरून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले
दोघा मुलांचे भांडण गोरखनाथ व लताबाई यांना सहन होत नव्हते. मुलेही ऐकत नव्हती, त्यामुळे त्यांनी कंटाळून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दुचाकी काढून दोघांनी गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका गाठले. तेथे चपला काढून त्यावर स्वतःची नावे लिहिली. त्यानंतर गोरखनाथ यांनी खंडाळा येथे राहत असलेल्या त्यांच्या साडूला फोन करून आत्महत्या करीत असल्याचे कळविले. त्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत फोन कट झाला होता. यानंतर दोघांनी गोदावरी पात्रात उडी घेऊन जीवन संपविले. या दोघांवरही शोकाकुल वातावरणात खंडाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.