अंबड-परळीच्या सेटिंगमुळे दोन उमेदवार बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:34 AM2017-11-07T00:34:00+5:302017-11-07T00:34:05+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या

 Two candidates unanimious due to Ambad-Parli setting | अंबड-परळीच्या सेटिंगमुळे दोन उमेदवार बिनविरोध

अंबड-परळीच्या सेटिंगमुळे दोन उमेदवार बिनविरोध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. माजी उच्चशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या पत्नीसाठी ‘अभाविप’प्रणीत विद्यापीठ विकास मंचने, तर राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ महाविद्यालयाच्या प्राचार्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत उत्कर्ष पॅनलने उमेदवार मागे घेत बिनविरोध निवडून दिले. एकूण सहा उमेदवार बिनविरोध आले आहेत.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत संस्थाचालक, प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठ शिक्षक आणि विद्यापरिषदेच्या गटात उमेदवारी मागे घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. संस्थाचालक गटात माजी उच्चशिक्षणमंत्री आमदार राजेश टोपे यांच्या पत्नी मनीषा टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत उत्कर्ष पॅनलतर्फे नामांकन दाखल केले होते. त्यांच्याविरोधात ‘अभाविप’प्रणीत विद्यापीठ विकास मंचतर्फे डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी नामांकन दाखल केले. डॉ. भारस्वाडकर यांनी नामांकन मागे घेण्यासाठी शेवटच्या क्षणी पडद्यामागे मोठ्या घडामोडी घडल्या. शेवटच्या क्षणाला मनीषा टोपे बिनविरोध निवडून येत नसतील तर त्यांची उमेदवारीच मागे घेण्याची तयारी केली होती. मात्र, राजेश टोपे यांनी थेट राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधत दोन्ही गटांचा एक-एक उमेदवार निवडून आणण्यावर एकमत केले. या एकमताला आमदार सतीश चव्हाण यांनी ऐनवेळी साथ दिल्यामुळे पंकजा मुंडे समर्थक प्राचार्य डॉ. रामचंद्र इप्पर यांच्या विरोधातील बीडच्या बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव सानप यांनी प्राचार्यांच्या गटात एनटीमधून दाखल केलेले नामांकन मागे घेतले. तर मनीषा टोपे यांच्यासाठी डॉ. कल्पलता पाटील भारस्वाडकर यांनी नामांकन मागे घेतले. त्यामुळे राजेश टोपे आणि पंकजा मुंडे यांच्या जवळचे दोन्ही उमेदवारांचा संबंधित गटात एकमेव अर्ज राहिल्यामुळे बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय उत्कर्ष पॅनलचे संस्थाचालक गटात राहुल म्हस्के, प्राचार्य गटात डॉ. शिवदास शिरसाठ, डॉ. तृप्ती देशमुख बिनविरोध आले. तर डॉ. रमेश मंझा हेसुद्धा बिनविरोध आले आहेत. मात्र, त्यांच्यावर उत्कर्ष आणि विद्यापीठ विकास मंचतर्फे दावा केला आहे. मात्र डॉ. मंझा यांनी आ. सतीश चव्हाण यांची भेट घेऊन उत्कर्ष पॅनलचा असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती डॉ. राजेश करपे यांनी दिली.

Web Title:  Two candidates unanimious due to Ambad-Parli setting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.