औरंगाबादेत गुन्हेशाखेने पकडले दोन गांजा तस्कर; १० किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 06:16 PM2020-11-12T18:16:41+5:302020-11-12T18:17:09+5:30
जीपमध्ये १० किलो ४८० ग्रॅम गांजा लपवून आणण्यात आल्याचे दिसून आले.
औरंगाबाद: चोरट्या मार्गाने शहरात गांजा घेऊन आलेल्या दोन जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचून बुधवारी रात्री पकडले. त्यांच्याकडून १० किलो ४८० ग्रॅम गांजा, जीप आणि दोन मोबाईल असा सुमारे ५ लाख ८० हजाराचा ऐवज जप्त केला. जावेद खान आयुब खान (३५, रा. नुतन कॉलनी) आणि युसूफ खान उमर खान दादा (४४, रा. समतानगर) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि कर्मचारी गस्तीवर असतांना स्कार्पिओ जीपमधून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली. यानंतर सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रात्री रोपळेकर हॉस्पिटल चौकात सापळा रचून संशयित जीप अडविली.
यावेळी पंचासमक्ष जीपची झडती घेतली असता दोन्ही आरोपी जीपमध्ये बसलेले होते. जीपमध्ये १० किलो ४८० ग्रॅम गांजा लपवून आणण्यात आल्याचे दिसून आले. आरोपीना अटक करून गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक जारवाल, हवालदार शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, गावडे, राजेंद्र साळुंके, प्रभाकर राऊत आणि कर्मचाऱ्यानी केली.