मनपाच्या ताफ्यात दोन कार्डियाक रुग्णवाहिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:03 AM2021-07-04T04:03:51+5:302021-07-04T04:03:51+5:30

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिका खरेदीसाठी राज्य शासनाने महापालिकेला सीएसआर निधीतून दीड कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. ...

Two cardiac ambulances in the convoy | मनपाच्या ताफ्यात दोन कार्डियाक रुग्णवाहिका दाखल

मनपाच्या ताफ्यात दोन कार्डियाक रुग्णवाहिका दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाहिका खरेदीसाठी राज्य शासनाने महापालिकेला सीएसआर निधीतून दीड कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते. या निधीतून दोन कार्डियाक, सहा रुग्णवाहिका खरेदी केल्या. कार्डियाक रुग्णवाहिका मनपाच्या यांत्रिकी विभागात दाखल झाल्या आहेत. उर्वरित रुग्णवाहिका लवकरच प्राप्त होणार आहेत.

कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत महापालिकेला रुग्ण ने-आण करण्यासाठी शहर बसचा वापर करावा लागला. मनपाच्या आरोग्य विभागाने भाडेतत्त्वावर काही रुग्णवाहिका घेतल्या होत्या. मात्र, त्यांचा खर्च बराच झाला. त्यामुळे स्वत:च्या रुग्णवाहिका असाव्यात म्हणून शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली होती. राज्य शासनाने सीएसआरमधून दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिला होता. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी या निधीतून दोन कार्डियाक आणि सहा साध्या पद्धतीच्या रुग्णवाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शासनाच्या जे. एम. पोर्टलवरून दोन कार्डियाक आणि सहा साध्या पद्धतीच्या रुग्णवाहिका खरेदीची प्रक्रिया राबविली. त्यातील दोन कार्डियाक रुग्णवाहिका शुक्रवारी मनपाच्या यांत्रिकी विभागाला मिळाल्या आहेत. यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. के. पंडित यांनी दोन्ही कार्डियाक रुग्णवाहिकांमध्ये यंत्रसामग्री बसविण्यासाठी मुंबईला पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. यंत्रसामग्री बसविल्यानंतर आरटीओ पासिंग करूनच आरोग्य विभागाला वापरण्यासाठी कार्डियाक रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत.

आठवडाभरात सहा रुग्णवाहिका येणार

दोन कार्डियाक रुग्णवाहिका मनपाला मिळाल्या आहेत. त्यासोबतच सहा साध्या पद्धतीच्या रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. या सहा रुग्णवाहिका आठवडाभरात मनपात दाखल होतील. यापूर्वी महापालिकेने अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निधीतून एक कार्डियाक आणि दोन साध्या रुग्णवाहिकांची खरेदी केलेली आहे. कार्डियाक रुग्णवाहिका मेल्ट्रॉन येथे, तर दोन साध्या रुग्णवाहिका एन-८ आणि मनपा कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: Two cardiac ambulances in the convoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.