गारखेड्यात भरधाव कारची दोन कारला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:02 AM2021-05-01T04:02:56+5:302021-05-01T04:02:56+5:30
या अपघाताविषयी प्राप्त माहिती अशी की, डॉ. सखा पाटील हे आज दुपारी त्यांच्या ओळखीचे प्रल्हाद राठोड यांच्यासह ...
या अपघाताविषयी प्राप्त माहिती अशी की, डॉ. सखा पाटील हे आज दुपारी त्यांच्या ओळखीचे प्रल्हाद राठोड यांच्यासह त्यांच्या डस्टर कारने (एमएच २० बीक्यू ३५५५) गारखेडा रोडवरील एका मंगल कार्यालयाकडे मधूनच घुसून जात होते. त्यांच्या मागे राठोड यांची कार (एम.एच.२० एफएफ २७२७) चालक घेऊन येत होता. त्याचवेळी गारखेड्याकडून सुसाट आलेल्या क्रेटा कार (एमएच२०-ईजे ५४०१)ने आलेल्या सौरव धनाजी मोहिते यांच्या कारची डॉ. पाटील यांच्यावर धडकून गजानन महाराज मंदिराकडून आलेल्या फॉर्च्युनर कारवर आदळला. या विचित्र अपघातात क्रेटा कारमधील एअर बॅग उघडल्यामुळे कारमधील मोहिते आणि सोबतच्या व्यक्तीला दुखापत झाली नाही. शिवाय डॉ. पाटील आणि राठोड यांनाही इजा झाली नाही. मात्र तिन्ही कारचे मोठे नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घोरपडे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेटा कारचालकासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर अपघातग्रस्त कार क्रेनच्या मदतीने घटनास्थळावरून जवाहरनगर पोलीस ठाण्यासमोर नेऊन उभ्या केल्या.
चौकट
आपसात तडजोडीमुळे पोलिसांत तक्रार नाही
या अपघाताला कारणीभूत कारचालक मालक आणि अन्य दोन कारमालक यांच्यात तडजोड झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत याविषयी त्यांनी तक्रार दिली नाही. परिणामी या अपघाताचा गुन्हा नोंद केला नसल्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.
चौकट..
विनापरवानगी फिरणाऱ्या कारचालकांना पोलिसांचे अभय
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करणे, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे आदी कलमानुसार गुन्हा नोंदवितात. विनामास्कची पावती देतात. या घटनेत मात्र पोलिसांनी एकाही कारचालकावर कारवाई केली नाही. अपघातग्रस्त तीन कारपैकी एक कार डॉक्टरांची आहे. त्यांना लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. मात्र अन्य प्रल्हाद राठोड आणि मोहिते हे पोलिसांना न जुमानता कार घेऊन फिरत असल्याचे या घटनेने समोर आले. असे असताना पोलिसांनी अन्य नागरिकांप्रमाणे त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मोहिते शासकीय ठेकेदार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.