खदानीत बुडून दोन मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:19 AM2019-06-29T00:19:06+5:302019-06-29T00:19:20+5:30
नक्षत्रपार्क येथील खदानीतील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली.
औरंगाबाद : नक्षत्रपार्क येथील खदानीतील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली. तुषार प्रकाश शिरसाट (१२), प्रदीप भगवान गजाले (९) अशी मृतांची नावे आहेत.
नक्षत्रवाडी परिसरातील नक्षत्र पार्कजवळील खदानीत पावसाचे पाणी साचले होते. दरम्यान, पाऊस सुरु असताना ही मुले खेळता खेळता पाण्यात गेली आणि पाय घसरुन बुडाली.
मुलांचा सर्वत्र शोध घेतला. पण ती कुठेही आढळून आली नाहीत. खदानीत मुले पडल्याचा संशय बळावल्याने परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यांनी पाण्यात मुलाचा शोध घेवून दोघांचे मृतदेह खदानीतील पाण्यातून बाहेर काढले.
दरवर्षी सातारा,देवळाई, नक्षत्रवाडी, कांचनवाडी या भागातील खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा बुडून मृत्यू होत असल्याच्या घटना घडत आहेत. उकाड्यानंतर शहर व परिसरात पहिल्यांदाच जोरदार पावसाने शुक्रवारी हजेरी लावली. सर्वत्र पाणी वाहताना दिसत होते.
त्या पावसाच्या पाण्यात खेळताना ही दोन मुले इतर मुलांसह नक्षत्रपार्क परिसरातील खदानीकडे गेली. त्यांचा पाय घसरून मुले पाण्यात पडली होती. पाण्याबाहेर काढलेले मुलांना उपचारासाठी रूग्णवाहिकेने शासकीय दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याविषयी सातारा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.