मौजमजेसाठी लुटमार करणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरूणांना अटक
By बापू सोळुंके | Published: May 6, 2023 08:18 PM2023-05-06T20:18:03+5:302023-05-06T20:18:38+5:30
पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
छत्रपती संभाजीनगर: पंक्चर झालेली दुचाकी ढकलत घेऊन जाणाऱ्या एका जणाला धमकावून त्याच्या खिशातील मोबाइल हिसकावून नेणाऱ्या दोन महाविद्यालयीन तरूणासह सलूनचालकाला सिडको पोलिसांनी घटनेनंतर २४ तासांत अटक केली.
धनंजय रामनाथ बिडवे(१९,), रोहन शालूमन हिवाळे(१९)आणि अथर्व हेमंत पाटील(१९, सर्व रा. मथुरानगर, सिडको एन-६)अशी अटकेतील तरूणांची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्यसूत्रधार धनंजय हा सलूनचालक आहे. तर रोहन आणि अथर्व हे एका महाविद्यालयात बीएस.स्सी.चे शिक्षण घेत आहेत. सिडको पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार आशिष भागवतराव चव्हाण(३३,रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) हे ५ मे रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास कामावरून घरी जात असताना सेवनहिल येथे त्यांची दुचाकी पंक्चर झाली. यामुळे ते दुचाकी ढकलत जालना रोडने घरी घेऊन जात होते.
एअर इंडियाच्या जुन्या कार्यालयाजवळ त्यांनी त्यांची दुचाकी उभी केली आणि ते थांबले. याचवेळी ट्रिपलसीट दुचाकीस्वार तेथे आले. त्यांनी चव्हाण यांच्याकडे पैशाची मागणी केली. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर आरोपींनी त्यांना धमकावत त्यांच्या खिशात हात घातला आणि खिशातील ७ हजाराचा मोबाइल हिसकावून घेतला. यावेळी त्यांना धमकावत आरोपी तेथून दुचाकीवर बसून निघून गेले. या घटनेनंतर चवहाण यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक अवचार, अंमलदार सुभाष शेवाळे, प्रदीप दंडवते, शिवाजी भोसले,विशाल सोनवणेआणि किरण काळे यांच्या पथकाने तपास करून अवघ्या २४ तासांत तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून तक्रारदार यांचा मोबाइल हॅण्डसेट जप्त केला.