कसाबखेडा येथे वीजेचा धक्का लागून दोन बांधकाम मजुरांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:36 PM2019-03-15T15:36:50+5:302019-03-15T15:37:41+5:30
घरासमोरून 11 हजार केव्ही व्होल्टेजच्या (हायपरटेन्शन) च्या विजेच्या तारा गेल्या आहेत.
खुलताबाद (औरंगाबाद ) : तालुक्यातील कसाबखेडा येथे घराच्या गॅलरीचे काम करत असलेल्या दोन बांधकाम मजुरांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. शेख नूर शेख इब्राहीम (52, कन्नड ) व शेख युसूफ शेख लड्डू (बनशेंद्रा ता.कन्नड) अशी मृतांची नावे आहेत.
कसाबखेडा येथील सत्तार दिलावर पठाण यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी मिस्री व कामगार हे कन्नड येथून आले आहेत. सत्तार यांच्या घरासमोरून 11 हजार केव्ही व्होल्टेजच्या (हायपरटेन्शन) च्या विजेच्या तारा गेल्या आहेत. प्लास्टिकच्या नळ्या लावून काठीच्या सहाय्याने या तारा घरापासून दुर केल्या आहेत. आज शुक्रवारी दुपारी घराच्या गॅलरीचे बांधकाम सुरु असताना लाकडी काठी तारांपासून दूर झाली. तारा थेट घरावर आल्या आणि बांधकामावरील मजुरांना याचा स्पर्श झाला. विजेच्या जोरदार धक्क्याने तीन मजूर खाली फेकले गेले. यावेळी शेख नूर शेख इब्राहीम (मिस्रीकामगार), शेख युसूफ शेख लड्डू व अन्य एकजण गंभीर जखमी झाले.
पोलीस पाटील संतोष सातदिवे, तंटामुक्त गावसमितीचे अध्यक्ष तनवीर पटेल, अजिम मनियार आदींनी तिघांनाही तात्काळ वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. सीमा बेंद्रे यांनी शेख नूर शेख इब्राहीम (मिस्रीकामगार), शेख युसूफ शेख लड्डू यांना तपासून मृत घोषित केले. अन्य एकजणावर उपचार करण्यात आले. दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची वार्ता कन्नड व बनशेंद्रा गावात पसरताच रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. मृतदेहांचे शवविच्छेदन सुरु असून घटनास्थळी खुलताबाद पोलीसांनी पंचनामा केला.