शुभ कल्याण सोसायटीच्या संचालक मंडळाविरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:22 AM2017-12-30T00:22:09+5:302017-12-30T00:22:12+5:30
कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शुभ कल्याण मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाविरोधात ठेवीदारांची १ कोटी ३५ लाख १० हजार १७६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक आणि क्रांतीचौक ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कळंब (जि. उस्मानाबाद) येथील शुभ कल्याण मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाविरोधात ठेवीदारांची १ कोटी ३५ लाख १० हजार १७६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक आणि क्रांतीचौक ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले.
सोसायटीचा अध्यक्ष दिलीप शंकरराव आपेट, संचालक भास्कर बजरंग शिंदे, अजय दिलीप आपेट, विजय दिलीप आपेट, अभिजित दिलीप आपेट, बापूराव ज्ञानोबा सोनकांबळे आणि तीन महिला संचालक, शंभूमहादेव शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रिजचे संचालक, शिवकुमार आणि रोडे (पूर्ण नाव नाही) यांचा आरोपींत समावेश
आहे.
याविषयी अधिक माहिती देताना क्रांतीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीपाद कुलकर्णी म्हणाले की, आरोपी संचालक असलेल्या मल्टिस्टेट को,आॅपरेटिव्ह सोसायटीची गुलमंडी रोडवर शाखा होती. या शाखेत जळगाव येथील रहिवासी अमर घनश्यामदास कुकरेजा यांनी २० लाख ४५ हजार रुपये ३ नोव्हेंबर २०१६ रोजी मुदतठेव ठेवली. या ठेवीच्या बदल्यात तक्रारदार यांना दहा डिमांड ड्राफ्ट दिले होते. हे डिमांड ड्राफ्ट बँकेत टाकल्यानंतर वटले नाहीत, म्हणून तक्रारदार आणि त्यांच्या सहकाºयांनी आरोपींना भेटून डी.डी. अनादर झाल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी विश्वासात घेऊन ही रक्कम वैयक्तिक कामासाठी शंभूमहादेव शुगर प्रा.लि. आणि पिंगळे शुगर अॅण्ड अॅग्रो प्रॉडक्टस्साठी वापरल्याचे सांगितले. तीन ते चार महिन्यांत तुमची रक्कम देतो, असे आश्वासन दिले. चार महिन्यांनंतर पैसे दिले नाही. उलट तक्रारदाराच्या नावे गुलमंडी येथील शाखेत बचत खाते उघडून त्यात २० लाख ४५ हजार रुपये जमा
दाखविले. ही शाखा फेब्रुवारी २०१७ मध्ये बंद झाली. यामुळे तक्रारदारांनी आरोपींकडे पैशासाठी तगादा लावला. तेव्हा दिलीप आपेट यांनी धनादेश दिले. ते धनादेशही अनादर झाल्याने तक्रारदारांनी पुन्हा संपर्क साधला असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे २८ डिसेंबर रोजी क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून आरोपींनी आपली ६२ लाख २१ हजार ७३६ रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद नोंदविली.
संपूर्ण कुटुंबाला घातला गंडा
गोपाल जुगलकिशोर जाजू (रा. गुलमंडी), त्यांची पत्नी, आई, भाऊ, वहिनी आणि अन्य लोकांनी याच शुभ मल्टिस्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीत ठेव ठेवली होती. मुदतीनंतर त्यांना मिळणारे ७२ लाख ८८ हजार ४४० रुपये जाजू आणि त्यांच्या नातेवाईकांना आरोपींनी परत केले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही संचालक मंडळाने पैसे न दिल्याने जाजू यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदवली.
फसवणुकीच्या गुन्ह्यात शुभ कल्याण मल्टिस्टेट को-आॅप. क्रेडिट सोसायटीचा अध्यक्ष शिवकुमार गंगाधर शेटे (५५), मूळ रा. कोल्हापूर याला पोलिसांनी पुणे येथून अटक केली. न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.वाय.एस. महंमद यांनी त्याला २ जानेवारी २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील रवींद्र अवसरमोल यांनी काम पाहिले.