अडीच किमी अंतरात जलवाहिनीत २ कोटी लिटर पाणी सोडले; पहिली हायड्रोलिक चाचणी यशस्वी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:50 IST2025-02-12T17:45:17+5:302025-02-12T17:50:02+5:30

गुड न्यूज! नवीन पाणीपुरवठा योजनेत ढोरकीन येथे २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची हायड्रोलिक टेस्ट घेऊन पाण्याचे प्रेशर तपासण्यात आले.

Two crore liters of water released into the canal over a distance of 2.5 km; first | अडीच किमी अंतरात जलवाहिनीत २ कोटी लिटर पाणी सोडले; पहिली हायड्रोलिक चाचणी यशस्वी!

अडीच किमी अंतरात जलवाहिनीत २ कोटी लिटर पाणी सोडले; पहिली हायड्रोलिक चाचणी यशस्वी!

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी एप्रिलपर्यंत येईल, असा दावा करण्यात येतोय. त्यातच सोमवारी रात्री महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ढोरकीन गावाजवळ २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी घेतली. ही टेस्ट यशस्वी झाली. अडीच किलोमीटर जलवाहिनीच्या चाचणीसाठी तब्बल दोन कोटी लिटर पाण्याचा वापर करण्यात आला.

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे जवळपास ८५ टक्के काम पूर्ण झाले. एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी शहरात येईल, असा दावा वारंवार करण्यात येतोय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे फक्त ७८ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, एवढ्या कमी वेळेत पाणी आणणे शक्य आहे का? हा मोठा प्रश्न आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतचे अंतर ३९ किमी आहे. ३७ किमी जलवाहिनी टाकली. दोन किमी काम बाकी आहे. काही ठिकाणी जलवाहिनीची हायड्रोलिक टेस्ट घेणे शक्य नाही. त्यामुळे रेडिओग्राफी टेस्ट घेण्यात आली. हायड्रोलिक टेस्ट घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता किरण पाटील, कनिष्ठ अभियंता बिलवाडे, जीव्हीपीआरचे महाव्यवस्थापक महेंद्र गुगुलोथू, अभियंता खलील अहेमद उपस्थित होते.

२.५ किमी अंतर
सोमवारी रात्री ढोरकीन गावाजवळ अडीच किमी अंतरात जलवाहिनीत दोन कोटी लिटर पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पाण्याला प्रेशर दिले. जलवाहिनीतील प्रेशर जेवढे पाहिजे तेवढे मिळाले. ही टेस्ट यशस्वी झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. एक किलोमीटर अंतरावर हायड्रोलिक टेस्टसाठी ७० लाख लिटर पाणी लागते. अडीच किलोमीटर अंतराच्या जलवाहिनीवरील हायड्रोलिक चाचणीसाठी दोन कोटी लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. पुढील काही दिवसांत बिडकीन, चितेगाव या ठिकाणी हायड्रोलिक टेस्ट घेतली जाणार आहे.

Web Title: Two crore liters of water released into the canal over a distance of 2.5 km; first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.