शहरावर दोन दिवसांच्या निर्जळीचे संकट?
By Admin | Published: July 15, 2014 12:44 AM2014-07-15T00:44:24+5:302014-07-15T01:04:11+5:30
विकास राऊत, औरंगाबाद शहराला केव्हाही निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
विकास राऊत, औरंगाबाद
शहराला केव्हाही निर्जळीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी एमबीआरपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० व १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांची निर्वहन क्षमता संपल्याने त्यांची चाळणी झालेली आहे. त्यामुळे त्यांना वारंवार गळती लागत आहे. जलवाहिन्यांना लागलेल्या गळतीमुळे सध्या रोज १० एमएलडी (१ कोटी लिटर) पाणी वाया जात आहे.
काल १३ रोजी खा. खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या सेना- भाजपा नगरसेवकांच्या बैठकीत पाणीपुरवठ्याचा विषय निघाला होता.
सिडको- हडकोसह शहरात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. यावरून नगरसेवकांनी अभियंत्यांवर प्रश्नांचा वर्षाव केला. शहरअभियंता एस.डी. पानझडे म्हणाले, जलवाहिन्यांना गळती लागलेली आहे. त्यांची डागडुजी करणे महत्त्वाचे आहे. दोन दिवसांचा कालावधी डागडुजी करण्यासाठी लागेल. दोन दिवस पाणीपुरवठा विभागाला बंद ठेवण्यासाठी पदाधिकारी जेव्हा परवानगी देतील. त्यानंतर दोन दिवस डागडुजी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, उपमहापौर संजय जोशी म्हणाले, दोन गळतीसाठी प्रशासनाने परवानगी मागितली आहे. त्यावर अजून विचार केलेला नाही.
१ कोटी लिटर पाण्याची रोज नासाडी
औरंगाबाद : जायकवाडी ते शहरापर्यंत ३५ कि़मी.च्या प्रवासात १ कोटी लिटर पाणी गळते आहे. ७४ हजार नागरिकांना हे पाणी १३५ लिटरच्या मापकाप्रमाणे मिळू शकते. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या ७०० व १४०० मि.मी.च्या दोन्ही जलवाहिन्यांची चाळणी झाली आहे. त्यांचे वयोमान संपले आहे. त्यामुळे पालिकेला गळत्यांची डागडुजी करण्यापलीकडे पर्याय नाही.
३१ मार्च २०१३ नंतर मनपाने डागडुजीसाठी मोहीम घेतलेली नाही. परिणामी, नागरिकांच्या तोंडचे पाणी जलवाहिनी मार्गावरील नाल्यांमध्ये वाहून जाते. एकीकडे दुष्काळी स्थिती निर्माण होत आहे, तर दुसरीकडे कोट्यवधीचे पाणी वाहून जात आहे.
पाच कोटींचे पाणी नाल्यात
रोज अंदाजे पाच कोटी रुपयांचे पाणी नाल्यात, ओढ्यात वाहून जात आहे. पालिकेला प्रति १ क्युबिक पाणी शहरात आणण्यासाठी अंदाजे १३ रुपये खर्च येतो़
१ एमएलडी म्हणजे १ हजार क्युबिक होतात़ दररोज अंदाजे १० एमएलडी म्हणजे १० हजार क्युबिक पाणी गळते आहे़ प्रति दिवस १० हजार क्युबिक पाणी वाहून जाते. दररोज १ लाख ३० हजार रुपयांचे पाणी वाया जाते आहे.
‘हर्सूल’चे पाणी दूषित होण्याचा धोका
शहरातील १६ वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलावात सध्या १३ फूट पाणी आहे. तलावाच्या परिसरात विविध धार्मिक विधी करून त्याचे निर्माल्य व कचरा तलावात फेकण्याचे प्रमाण वाढल्यामुळे तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तलाव परिसरात मनपाने सुरक्षारक्षक वाढवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गेल्या वर्षी दुष्काळात तो तलाव पूर्णत: आटला होता. तलावातील २० टक्के गाळ काढल्यानंतर पावसाळ्यात तलावामध्ये १९ फूट पाणीसाठा झाला. तलावाची क्षमता सुमारे ३० फुटांपर्यंत आहे. सध्या तलावात १३ फूट पाणीसाठा आहे. शहरातील जुन्या भागातील १६ वॉर्डांतील नागरिकांना हर्सूल तलावातून शुद्ध पाणीपुरवठा नोव्हेंबर २०१३ साली सुरू झाला.
तलावातून दोन दिवसांआड ६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून पाणी घेण्याचा ताण थोड्या फार प्रमाणात कमी झाला. यामुळे मनपाची वीज, वेळ, पैसा वाचण्यास मदत झाली. २०१२ ते नोव्हेंबर २०१३ असा दीड ते दोन वर्षे हर्सूल तलावातून पाणीपुरवठा बंद होता.