अकरावीसाठी दोन दिवसांची मुदतवाढ
By Admin | Published: June 28, 2017 12:42 AM2017-06-28T00:42:28+5:302017-06-28T00:50:33+5:30
औरंगाबाद : अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणीसाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके यांनी जाहीर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अकरावीसाठी राबविण्यात येणाऱ्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत नोंदणीसाठी आणखी दोन दिवस मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक वैजिनाथ खांडके यांनी जाहीर केला. या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना भाग एक आणि भाग दोनअंतर्गत २९ जूनपर्यंत आॅनलाइन नोंदणी करता येईल.
या वर्षापासून औरंगाबाद शहरात प्रथमच अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. आज मंगळवारपर्यंत जवळपास १९ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण १०४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कला शाखेला ७ हजार ४४० विद्यार्थी, विज्ञान शाखेला १० हजार १२० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला ३ हजार ४८० आणि एमसीव्हीसी शाखेला १ हजार ९२० विद्यार्थी, अशी एकूण २२ हजार ९४० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. यापैकी मंगळवारपर्यंत प्रवेशाच्या जवळपास ३ हजार जागांसाठी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे शिक्षण उपसंचालकांना मुदतवाढीचा निर्णय घ्यावा लागला.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाची गेल्या दहा ते बारा दिवसांपासून आॅनलाइन प्रवेश नोंदणीसाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू झालेली आहे. दोन दिवसांत ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक आणि भाग दोनमध्ये नोंदणी अपूर्ण राहिलेली आहे. त्या विद्यार्थ्यांनी दोन्ही भागांतील नोंदणी अचूकपणे करणे आवश्यक आहे. मनपा क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ शाळेतून, तर मनपा क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनी कोणत्याही झोन केंद्रामध्ये आवश्यक कागदपत्रे दाखवून दोन्ही भागांत आॅनलाइन नोंदणी करावी.