लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध दोन निवडणूक याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 03:33 PM2024-08-01T15:33:11+5:302024-08-01T16:00:59+5:30

जात आणि वैधता प्रमाणपत्रांसंदर्भातील याचिकेत उच्च न्यायालयाची नोटीस

Two election petitions filed against Latur MP Shivaji Kalge | लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध दोन निवडणूक याचिका दाखल

लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध दोन निवडणूक याचिका दाखल

छत्रपती संभाजीनगर : लातूरचे खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दोन निवडणूक याचिका दाखल झाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी आणि नगरसेवक आल्टे, ‘वंचित’चे डमी उमेदवार दत्तू नरसिंगे, व्ही. एम. भोसले आणि ॲड. करण जोहरे यांनी दुसरी निवडणूक याचिका दाखल केली आहे.

डॉ. काळगे यांच्या ‘जातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र’ रद्द करण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी बुधवारी डॉ. काळगेंसह प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. सप्टेंबरमध्ये पुढील सुनावणी होईल.

उदगीरकर यांनी प्रमाणपत्रांसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार डॉ. काळगे यांनी पुणे येथील समाज कल्याण कार्यालयात १९८६ सालची काही शालेय कागदपत्रे सादर करून ‘माला जंगम’ जातीचे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी दावा दाखल केला होता. सदर कार्यालयाने आणखी काही कागदपत्रांची मागणी करून प्रकरण लातूरच्या समितीकडे पाठविले. डॉ. काळगे माला जंगम असल्याचे सिद्ध करू शकले नाहीत, असा अहवाल लातूरच्या समितीने पाठविला. डॉ. काळगे यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये ‘हिंदू जंगम’ अशी नोंद होती. १९७६ला मुख्याध्यापकांनी ‘माला’ शब्द जोडला. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी न घेता जन्मतारखेतही खाडाखोड (ओव्हर राईट) केली. या कारणावरून पुणे येथील समाज कल्याण कार्यालयाने डॉ. काळगे यांचा जातीचा दावा अवैध ठरविला. त्याविरुद्ध त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता त्यांनी जातीचा दावा वैध ठरविला होता.

दरम्यान, समाज कल्याण विभागाचे उपसंचालक स्वत:हून अपिलातील आदेशाचे ‘पुनर्विलोकन’ (रिव्ह्यू) करू शकतील, अशा शासन निर्णयानुसार तत्कालीन उपसंचालकांनी स्वत:हून पुनर्विलोकन करून विभागीय आयुक्तांचा आदेश रद्द केला. त्याविरुद्ध डॉ. काळगे यांनी याचिका दाखल केली असता खंडपीठाने वरील शासन निर्णय रद्द करुन उपसंचालकांचा आदेश कायम केला. असे असताना डॉ. काळगे यांनी २०१४ला जातीचे दुसरे प्रमाणपत्र आणि २०१९ला वैधता प्रमाणपत्र प्राप्त केले. त्याला उदगीरकर यांनी याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. उदगीरकर यांच्यावतीने ॲड. पूनम बोडके पाटील बाजू मांडत आहेत. त्यांना ॲड. विजयकुमार बोडके सहकार्य करीत आहेत.

Web Title: Two election petitions filed against Latur MP Shivaji Kalge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.