भविष्य सांगण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देत लुटणारे दोन भोंदू अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 02:05 PM2021-07-26T14:05:29+5:302021-07-26T14:08:40+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्यानंतर आरोपींना अधिक तपासासाठी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
औरंगाबाद : गुरुपौर्णिमेच्या दिवशी भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एकट्या महिलांना पाहून गुंगीचे औषध देत लुटणाऱ्या दोन भोंदूबाबांना गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. या दोघांची झाडाझडती घेतली असता, दोन ठिकाणी केलेल्या चोरीचा मुद्देमालही त्यांच्याकडे सापडला. पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मुकुंदवाडी भागातील ज्ञानेश्वर कॉलनी येथे एका महिलेला भविष्य सांगण्याच्या बहाण्याने पांढऱ्या रंगाचे धोतर, भगव्या रंगाचा शर्ट आणि डोक्याला पिवळा फेटा बांधलेल्या व्यक्ती घरात शिरला. भविष्य सांगण्यासाठी साहित्य ठेवलेले असताना त्याने गुंगीचे औषध मिसळलेला पदार्थ टाकून महिलेला वास घेण्यास लावले. वास घेतल्यानंतर महिलेला गुंगी आली. हा डाव साधत भोंदूने ३२ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी (दि.२२) भवानीनगर येथील गल्ली नंबर ६ मध्ये एकटी राहत असलेल्या महिलेला दोन भोंदूंनी गुरुपौर्णिमेनिमित्त साखर खाण्यास मागितली. जेव्हा महिलेने साखर खाण्यास दिली असता, महिलेलाच साखर खायला लावून हातावर भंडारा टाकून भोवळ आणली. यानंतर महिलेच्या घरातील ८ हजार रुपये घेऊन पोबारा केला.
या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन घटनांमुळे शहरात दहशत निर्माण झाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाला पेट्रोलिंग करीत असताना दोन संशयित व्यक्ती श्रीकृष्णनगर भागात फिरत असल्याची माहिती मिळाली. या ठिकाणी गुन्हे शाखेने सापळा लावून योगेश खंडू सोळंके (२७, मुळ गाव कोथळज, जि. हिंगोली, ह.मु.हिवरा फाटा, करमाड) आणि विश्वनाथ नारायण शिंदे (३२, मूळगाव बोरगाव, ता. मालेगाव, जि. वाशिम, ह.मु. हिवरा फाटा, करमाड) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दोन्ही गुन्ह्याच्या संदर्भात विचारपूस केली असता, त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल देशमुख, अंमलदार सुधाकर मिसाळ, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, नितीन देशमुख, ज्ञानेश्वर पवार यांनी केली.
हा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोन भोंदूबाबाकडून ४३ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या, ८ हजार रुपये रोख, फेटा, कवड्याची माळ, भंडाराची कातडी पिशवी, खंजीर वाद्य, गणपतीची मूर्ती, खंडोबाची मूर्ती, तांदुळ, खोबरा वाटी, हळद, राशीचे खडे, रुद्राक्ष, आधारकार्ड, मनगटी घड्याळाचा समावेश आहे.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
गुन्हे शाखेच्या पथकाने पकडल्यानंतर आरोपींना अधिक तपासासाठी मुकुंदवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. हे आरोपी एकट्या महिलांना पाहून हेराफेरी करीत त्यांच्याकडील ऐवज लंपास करीत होते. तसेच दोन दिवसांपूर्वीच शहरात आलेले असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप वाघ करीत आहेत.