कर्जबाजारीला कंटाळून मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 08:19 PM2020-07-13T20:19:28+5:302020-07-13T20:20:21+5:30
शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली
परभणी/औरंगाबाद : कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून रविवारी मराठवाड्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील अर्जुन रावसाहेब शेटे (५०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना १२ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली़
अर्जुन शेटे यांना दहीखेड शिवारात ३८ आर जमीन आहे. त्यांनी २०१४ मध्ये भारतीय स्टेट बँकेतून ४० हजार रुपये कर्ज घेतले होते़ २०१५ मध्ये या कर्जाचे पुनर्गठण करून परत ४० हजार रुपये उचलले़ २०१६ मध्ये ४० हजार रुपये कर्ज घेतले होते़ एकूण १ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज त्यांच्याकडे होते़ कर्जमाफी योजनेत हे कर्ज माफ झाले नाही़ त्यामुळे शेटे यांना चिंता लागली होती़ या चिंतेतूनच अर्जुन शेटे यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ मुंजा अर्जुन शेटे यांच्या माहितीवरून सोनपेठ पोलीस ठाण्यात अकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळीराम जाधव तपास करीत आहेत़
आर्थिक विवंचनेतून संपवले पहुरी येथील शेतकऱ्याने जीवन
औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पहुरी येथील सुदाम शांताराम मगर (२४) या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेतला. ही घटना रविवारी उघडकीस आली. सुदाम मगर यांचेकडे दोन एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक तसेच खाजगी कर्ज होते. ते फिटत नसल्याने ते तणावात होते. त्यातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी, असा परिवार आहे. सोयगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.