दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांपैकी दोघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:48 AM2019-03-26T00:48:30+5:302019-03-26T00:48:52+5:30
पैठण तालुक्यातील कुतुबखेडा फाट्यावर दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. तर अन्य तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.
पाचोड : पैठण तालुक्यातील कुतुबखेडा फाट्यावर दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. तर अन्य तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.
पकडलेल्या दोघांपैकी एक आरोपी बीड जिल्ह्यातील ‘मोक्का’मधील फरार आरोपी आहे. ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत हे आपल्या सहकाऱ्यांसह पैठण तालुक्यात गस्त घालत होते, तेव्हा त्यांनी ही कारवाई केली. पकडलेल्या दोन आरोपींना पाचोड पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्यांनी आपली नावे राजेश उर्फ राजा उर्फ हिंदीवाला (रा. गंगापूर), दिलीप उर्फ ठकसेन भोसले उर्फ मुकेश दिलीप पवार, राजेश उघड्या उर्फ हिंदी पवार उर्फ राजू काळे (रा.गंगापूर) व नितीन मिस्त्रीलाल उर्फ मिस्त्र्या चव्हाण (रा. गेवराई) असे सांगितले. राजेश उर्फ राजा हिंदीवाला याच्यावर गेवराई जि.बीड येथील पोलीस ठाण्यात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असून बीड पोलीस त्याचा मागील दोन वर्षांपासून शोध घेत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. सुभाष भुजंग, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, गणेश जाधव, रतन वारे, संजय काळे, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, गणेश गांगवे, सागर पाटील, रामेश्वर धापसे, प्रमोद साळवे, राहुल पगारे, लटपटे आदींनी केली.