खताचा काळाबाजार रोखण्यासाठी दोन भरारी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:04 AM2021-05-21T04:04:12+5:302021-05-21T04:04:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क फुलंब्री : तालुक्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून, या खताचा काळाबाजार होऊ नये, म्हणून कृषी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
फुलंब्री : तालुक्यात रासायनिक खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून, या खताचा काळाबाजार होऊ नये, म्हणून कृषी विभागाकडून दोन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. तर शेतकऱ्यांना ई-पॉस मशीनवर अंगठा (थम्ब) दिल्याशिवाय खत मिळणार नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
तालुक्यात खरीप हंगामाकरिता १ मे रोजी विविध प्रकारची रासायनिक खते उपलब्ध झाली आहेत. या खतांची विक्री शासनाच्या दराप्रमाणे व्हावी, चढ्या दराने विक्री होता कामा नये, याकरिता कृषी विभागाच्यावतीने तयारी केली जात आहे. एक जिल्हास्तरीय तर दुसरे तालुकास्तरीय अशी दोन भरारी पथके नेमण्यात आली आहेत. ही पथके प्रत्येक दुकानावर जावून तपासणी करणार आहेत.
फुलंब्री तालुक्यातील खरीप हंगामाकरिता कृषी विभागाने २५ हजार ८३ मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी केली होती. त्यापैकी १९ हजार १०६ मेट्रिक टन मंजूर झाले तर आजघडीला १३ हजार ६५२ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे तर बाकीचे खतही लवकरच उपलब्ध होणार आहे.
पन्नास टक्के खताची विक्री
तालुक्यात १ मे रोजी १३ हजार मेट्रिक टन रासायनिक खते उपलब्ध झाली होती. यातील साडेसहा हजार मेट्रिक टन खताची विक्री झाली आहे. जास्त शेती असलेल्या शेतकऱ्यांनी खत खरेदी करून ठेवले आहे. फुलंब्री तालुका भरारी पथकामध्ये तालुका कृषी अधिकारी काकासाहेब इंगळे, आर. व्ही. शेख, मंडल कृषी अधिकारी के. पी. बोराडे यांचा समावेश आहे. या तीन सदस्यीय पथकाकडून गेल्या आठवड्यापासून खताच्या दुकानांची तपासणी केली जात आहे. खताची विक्री ही ऑनलाईन पद्धतीने होणार असून, खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याचे आधारकार्ड जोडले जाणार असून, त्याचा अंगठा घेतल्याशिवाय खत दिले जाणार नाही.