दोन उद्यानांचे बदलणार रूपडे
By Admin | Published: May 14, 2017 11:13 PM2017-05-14T23:13:04+5:302017-05-14T23:15:34+5:30
उस्मानाबाद : शहरातील संभाजी उद्यान, जिजामाता उद्यानाचे नुतनीकरण केले जाणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : नगर परिषदेकडून शहराच्या विविध भागात लहान-मोठी उद्याने उभारली आहेत. परंतु, उद्यानांच्या देखभाल दुरूस्तीकडे कानाडोळा झाला. त्यामुळे जवळपास सर्वच उद्यानांना अक्षरश: बकालत्व आले आहे. पालिका निवडणुकीमध्येही विविध पक्षाच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा ठळकपणे नमूद करण्यात आला होता. त्यानुसार आता शहरातील संभाजी उद्यान, जिजामाता उद्यानाचे नुतनीकरण केले जाणार आहे. तर पांढरी स्मशानभूमी परिसरात नवीन उद्यान साकारण्यात येणार आहे. या उद्यानांवर सुमारे १ कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.
शहरातील देशपांडे स्टॅन्डनजीक जिजामाता उद्यान आहे. काही वर्षांपूर्वी या उद्यानावर लाखो रूपये खर्च करून बच्चेकंपनीसाठी खेळण्या तसेच कारंजेही बसविण्यात आली होती. पेवरब्लॉकच्या माध्यमातून पदपाथ तयार करण्यात आला होता. त्यामुळे या उद्यानात नागरिकांची सातत्याने गर्दी असे. परंतु, कालांतराने पालिकेने उद्यानाच्या देखभाल दुरूस्तीकडे साफ दुर्लक्ष केले. वेळीच लक्ष न दिले गेल्याने सध्या या उद्यानाला अवकळा आली आहे. कारंजाचीही मोडतोड झाली आहे. पदपाथाचे पेवरब्लॉक उखडले आहेत. कंपाऊंडवॉलही जागोजागी ढासळली आहे. अशीच अवस्था संभाजी उद्यानाची झाली आहे. तारेचे कंपाऊंड तुटले आहे. बच्चेकंपनीसाठी बसविण्यात आलेल्या खेळण्यांचे केवळ सांगाडे उरले आहेत. पाण्याअभावी गवतही नाहीसे झाले आहे. तारेचे कुंपण तुटल्याने उद्यानात मोकाट जनावरांचा वावर असतो. तसेच आजुबाजुचे नागरीक वाहनेही उद्यानात उभी करतात. दरम्यान, या दोन्ही उद्यानांचे आता रूपडे बदलणार आहे. पालिकेकडून यासाठी सुमारे एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे. बच्चेकंपनीला आकर्षित करतील, अशी उद्याने निर्माण करण्यात येणार आहेत. उद्यानामध्ये वेगवेगळ्या खेळण्या बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अकार्षक झाडांची लागवडही केली जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या फुलांच्या झाडांचा समावेश असेल. एवढेच नाही तर गवताच्या माध्यमातून हिरवळ निर्माण केली जाणार आहे. दरम्यान, या दोन उद्यानांच्या विकासासोबत पांढरी स्मशानभूमी परिसरात नवीन उद्यान निर्माण करण्यात येणार आहे. या तीन उद्यानांसाठी मिळून तब्बल १ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.