गेवराईत दोन, माजलगावात एकाचा खून
By Admin | Published: September 10, 2015 12:07 AM2015-09-10T00:07:12+5:302015-09-10T00:33:30+5:30
गेवराई/माजलगाव : जिल्ह्यात खुन प्रकरणे वाढत असून बुधवारी पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत
गेवराई/माजलगाव : जिल्ह्यात खुन प्रकरणे वाढत असून बुधवारी पुन्हा खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. शिक्षकाच्या बदलीच्या कारणावरुन गेवराई तालुक्यातील सुलतानपुरमध्ये दोन गटात मारामाऱ्या झाल्या. शिक्षकाने दोघांवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामुळे ते दोघे मयत झाले तर एकजण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर क्षुल्लक कारणावरुन माजलगावमध्ये एकाचा खुन करण्यात आला.
माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील अंगद रामप्रसाद इंगळे (वय २० वर्षे) या युवकांचा चाकुने भोसकून खुन केल्याची घटना बुधवारी साय ५च्या सुमारास घडली. माजलगाव तालुक्यातील राजेगाव येथील अंगद रामप्रसाद इंगळे व इतर युवक बाजार तळावर बसले होते. यावेळी किशोर लक्ष्मण मंगुळवार हा तीथे आला. त्या ठिकाणी अंगद इंगळे व किशोर मंगुळवार यांच्यात क्षुल्लक कारणावरून शाब्दीक चकमक झाली असता, किशोर मंगळवार यांने अंगद इंगळे यांचा गळा दाबुन पोटावर चाकुने वार केला. यामध्ये अंगद इंगळेचा मृत्यु झाला. त्यास माजलगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.
दुसरी घटना गेवराई तालुक्यातील सुलतानपुर येथे घडली. सुलतानपुर येथील जिल्हा परिषदेतील शिक्षकाने मुकूंद खेत्रे याने शाळेतून एका विद्यार्थ्यास हाकलुन दिले होते. त्यामुळे त्याचे आई-वडील शाळेत गेले असता शिक्षक खेत्रे यांनीही त्यांनाही हाकलुन दिले होते. त्यामुळे दहा ते बारा ग्रामस्थांनी जि.प. अध्यक्ष व शिक्षण विभागाकडे त्यांच्या बदलीची मागणी केली होती. याचा राग खेत्रे यांच्या मनात होता. दरम्यान बुधवारी रात्री गावातील विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे महादेव रामप्रसाद खेत्रे व योगेश लक्ष्मण खेत्रे तसेच दीपक बनकर हे डीपीकडे गेले होते. अंधाराचा फायदा घेत शिक्षक मुकुंद खेत्रे याने महादेव खेत्रे व योगेश खेत्रे यांच्यावर चाकूचे वार केले. यामुळे ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्याला दीपक बनकर याने प्रतिरोध केला असता त्याच्यावरही शिक्षक खेत्रे याने वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. या तिघांना जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी दोघांना मयत घोषित केले. तर दीपक बनकर हा जखमी आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलीस गावात दाखल झाले होते. त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, गावातील लोकांचे जवाब घेण्याची प्रक्रिया बुधवारी रात्री दहा वाजता सुरू होती. (वार्ताहर)