जागेच्या वादातून दोन गटांत मारहाण; सहा जखमी
By Admin | Published: March 17, 2016 11:54 PM2016-03-17T23:54:18+5:302016-03-17T23:59:19+5:30
गंगाखेड : जागेच्या वादातून दोन गटात मारहाण झाल्याची घटना शहरातील रोशन मोहल्ला परिसरात १७ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
गंगाखेड : जागेच्या वादातून दोन गटात मारहाण झाल्याची घटना शहरातील रोशन मोहल्ला परिसरात १७ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास अंबाजोगाई येथे हलविले आहे.
रोशन मोहल्ल्यातील शेख सादेक शेख इस्माईल कुरेशी, मो.इसाक शेख इस्माईल कुरेशी, शेख समीर शेख जमील कुरेशी व त्यांचे शेजारी राहणारे शेख मुस्तफा खाजामियाँ कुरेशी, शेख जावेद मुस्तफा कुरेशी, जकियाबी मुस्तफा कुरेशी यांच्यात जागेचा वाद होता. या वादातूनच गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन्ही गटांत मारहाण झाली. या मारहाणीमध्ये शेख जावेद यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. त्यांचा पायही फॅक्रचर झाला आहे.
शेख जावेद यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोचार करुन अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी पाठविले आहे. तर शेख सादेक शेख समीर हे देखील गंभीर जखमी असून त्यांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जागेच्या वादातून ही घटना घडली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता. (प्रतिनिधी)
सेलूत संशयित दरोडेखोरास पकडले
परभणी : सेलू शहरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ संशयितरित्या फिरणाऱ्या एका आरोपीस पोलिसांनी गुरुवारी पहाटे ४ वाजता पकडले. सदर आरोपीला सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पकडलेल्या आरोपीचे नाव जसविंदरसिंग हरिसिंग ढिल्लो असे आहे. सेलू शहरात पोलिस कर्मचारी गस्त घातल असताना गुरुवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास सेलू पोलिस ठाण्यात काही जणांनी माहिती देऊन सेलू-परभणी या रस्त्यावर जलशुद्धीकरण केंद्राजवळील कुऱ्हाडकर यांच्या आखाड्याजवळ एक चोर असल्याची माहिती दिली. या माहितीवरुन गस्त घालणारे कर्मचारी, स्थानिक कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने एका ४० वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. संशयिताचे नाव जसविंदरसिंग हरिसिंग ढिल्लो असे असून तो सुमनापटियाला येथील रहिवासी आहे. हा आरोपी पंजाबी भाषेत बोलत असल्याची माहिती दिली. हाच व्यक्ती १६ मार्च रोजी मध्यरात्री उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी निवासस्थाने परिसरात फिरत होता.