पडेगावमध्ये दोन गट समाेरासमोर भिडले; लाठ्या, काठ्या अन् दगडांचा वर्षाव

By राम शिनगारे | Published: January 23, 2024 01:04 PM2024-01-23T13:04:25+5:302024-01-23T13:06:15+5:30

पोलिसांची तत्परता : काही वेळातच परिस्थितीवर नियंत्रण, ६४ जणांना अटक

Two groups clashed in Padegaon; police arrested 64 | पडेगावमध्ये दोन गट समाेरासमोर भिडले; लाठ्या, काठ्या अन् दगडांचा वर्षाव

पडेगावमध्ये दोन गट समाेरासमोर भिडले; लाठ्या, काठ्या अन् दगडांचा वर्षाव

छत्रपती संभाजीनगर : पडेगावातील एका घराच्या समोर चार मुले बसल्याच्या कारणावरून दोन गटांत वादावादी झाली. या वादावादीचे पर्यावसान लाठ्या-काठ्या आणि दगडफेकीमध्ये झाले. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच उपायुक्त नितीन बगाटे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी आला. दोन्ही गटांतील ६४ जणांना अटक केल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.

छावणी पोलिस ठाण्यात मोहम्मद जिशान नजर मोहम्मद (रा.मिटमिटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार अल्पवयीन मुले येऊन त्यांच्या घराच्या परिसरात सोमवारी दुपारी बसली. या मुलांना समजावून सांगितले असता, त्यातील एका मुलाने स्वत:च्या आईला बोलावून घेतले. त्या मुलाच्या आईने जिशान यांना मारहाण केली. त्यानंतर, काही वेळातच १०० ते १२५ लोकांचा जमाव चालून आला. या जमावाने लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत दगडफेक केली. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले. त्याच वेळी शेख आरेफ शेख उस्मान (रा.कासंबरी दर्गा, पडेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावरून वाद आहेत. विरोधी गटाचे लोक रस्त्याने जाण्यापासून अडवणूक करतात. सोमवारी त्याच रस्त्याने जात असताना काहींनी वाद उकरून काढला. त्यानंतर, ४० ते ५० लोकांनी त्यांच्या हातातील लाठ्या-काठ्या, दांडे, लोखंडी रॉड, तलवारी, दगडाने मारहाण केली. त्यात अनेक जण गंभीर जखमी झाल्याचेही शेख आरेफ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. मोहम्मद जिशान नजर मोहम्मद यांच्या तक्रारीवरून २७, तर शेख आरेफ यांच्या तक्रारीवरून ३७ जणांना अटक केल्याची माहिती निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली.

शहर पोलिसांची तत्परता
शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असताना पडेगावमध्ये घडलेल्या घटनेची माहिती मिळताच, छावणी ठाण्याचे निरीक्षक कैलास देशमाने, उपनिरीक्षक रावसाहेब जोंधळे, गणेश केदार, कैलास अन्नलदास यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी पोलिस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक आयुक्त महेंद्र देशमुख यांच्यासोबत राखीव पोलिस दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे काही वेळातच परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविले.

Web Title: Two groups clashed in Padegaon; police arrested 64

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.