तक्रार देण्यासाठी गेलेले दोन गट पोलिस ठाण्यातच भिडले, १५ जणांची एकमेकांना तुंबळ हाणामारी
By सुमित डोळे | Published: February 20, 2024 11:50 AM2024-02-20T11:50:45+5:302024-02-20T11:51:41+5:30
दोन्ही गटाच्या सदस्यांनी ठाण्याच्या आवारातच एकमेकांना शिवीगाळ केली व काही क्षणात त्यांच्यात हाणामारी सुरू झाली.
छत्रपती संभाजीनगर : परिसरात हाणामारी करून तक्रार देण्यासाठी गेलेले दोन गट पोलिस ठाण्यातच एकमेकांना भिडले. जवळपास १० मिनिटे १२ ते १५ जणांची तुंबळ हाणामारी सुरू होती. सिडको पोलिस ठाण्यात रविवारी रात्री ११:३० वाजता ही घटना घडली.
रविवारी रात्री ९ वाजता सिडको पोलिसांना नामांतर कॉलनीत दोन गटांमध्ये वाद सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली. अंमलदार भानुदास खिल्लारे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तेथे दोन्ही गटांना बाजूला करून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. ११:१५ वाजता वैभव काशीनाथ बोर्डे व अन्य लोक ठाण्यात दाखल झाले. त्याचवेळी दुसऱ्या गटाचे अनिल सर्जेराव कोरके साथीदारांसह तक्रारीसाठी ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी दोघांना ठाण्यात थांबून इतरांना ठाण्याबाहेर वेगवेगळे उभे राहण्यास सांगितले.
मात्र, तरीही दोन्ही गटाच्या सदस्यांनी ठाण्याच्या आवारातच एकमेकांना शिवीगाळ केली व काही क्षणात त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. याप्रकरणी वैभव, विजय काशीनाथ बोर्डे, विक्रम काशीनाथ बोर्डे, तारा काशीनाथ बोर्डे, वंदना विक्रम बोर्डे, रंजना विजय बोर्डे, अनिल कोरके, मिलिंद सर्जेराव कोरके, भास्कर वामन दाभाडे, सोनू जगदीश दाभाडे, सोनी भास्कर दाभाडे, ज्योती अनिल कोरके यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.