जेव्हा बंदुकीने विमानांना दिला जात असे सिग्नल, चिकलठाणा विमानतळावर दोन बंदुकींचे जतन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 09:07 IST2022-06-06T09:06:09+5:302022-06-06T09:07:30+5:30
Aurangabad : स्वातंत्र्यापूर्वीच १९३६ मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झाले होते. त्या वेळी फ्लेअर गन अथवा व्हेरी पिस्टल अशी नावे असलेल्या बंदुकींनी सिग्नल दिला जात असे.

जेव्हा बंदुकीने विमानांना दिला जात असे सिग्नल, चिकलठाणा विमानतळावर दोन बंदुकींचे जतन
औरंगाबाद : विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफसाठी आता आधुनिक सिग्नल यंत्रणेचा वापर केला जातो; परंतु कधी काळी विमानांना सिग्नल देण्यासाठी बंदुकांचा वापर होत होता. या बंदुकांचा वापर मानवी जीव घेण्यासाठी केला जात नव्हता, तर विविध रंग हवेत उडवून सिग्नल देण्यासाठीच त्यांचा वापर करण्यात येत होता. कधी काळी वापरल्या गेलेल्या अशाच दोन बंदुका चिकलठाणा विमानतळावर जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
स्वातंत्र्यापूर्वीच १९३६ मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झाले होते. त्या वेळी फ्लेअर गन अथवा व्हेरी पिस्टल अशी नावे असलेल्या बंदुकींनी सिग्नल दिला जात असे. ‘व्हेरी पिस्टल’ हे नाव युनायटेड स्टेट्स नेव्हीचे लेफ्टनंट एडवर्ड डब्ल्यू. व्हेरी या शोधकर्त्याच्या नावावरून पडले. त्यांनी सिंगल ॲक्शन फायरिंग मेकॅनिझमसह मोठ्या कॅलिबर सिंगल शॉट पिस्तूलचा शोध लावला, जे हवेत विशेष फ्लेअर्स उडवू शकतात. संकटात असताना सिग्नल पाठवण्यासाठी आणि स्वत:ची स्थिती सांगण्यासाठी, तसेच मदतीसाठी त्यांचा वापर केला जात असे. लाल, हिरवा आणि पांढरा या तीन रंगांद्वारे सिग्नल देण्यात येत असे.
योग्य निगा राखून जपला जातोय अमूल्य ठेवा
- बंदुकींची निगा राखून हा ठेवा जतन केला जात आहे, असे चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘एटीसी’चे सहायक महाव्यवस्थापक विनायक कटके यांनी सांगितले.