दोन तास वाहतूक कोंडी
By Admin | Published: May 30, 2017 11:44 PM2017-05-30T23:44:29+5:302017-05-30T23:48:09+5:30
जालना : शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. मंगळवारी दुपारी बारा वाजता मस्तगड चौकात तब्बल दोन तास वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली.
सुभाष चौकातून मस्तगडकडे जाणाऱ्या व मस्तगडकडून लोखंडी पुलाकडे येणाऱ्या रस्त्यांचे काम एकाच वेळी सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे मस्तगडमार्गे मुथाबिल्डिंग जाणाऱ्या वाहनांना मंमादेवी मंदिरासमोरून जावे लागत आहे. सुभाष चौकातही सिमेंट रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. मंगळवारी दुपारी मंमादेवी मंदिरासमोर दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली. गरीबशहा बाजार, नटराज टॉकीज, टाऊन हॉल व रेल्वेस्टेशन रस्त्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या. चौकात वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी हजर नसल्यामुळे वाहतूक कोंडी दोन तास कायम होती. अनेकवेळा रुग्णवाहिकाही या कोंडीत सापडत असल्याने रुग्णाच्या जिवावर बेतण्याची भिती व्यक्त होत आहे.