घाटीत कोरोना रुग्ण दोनशेपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:02 AM2021-03-04T04:02:11+5:302021-03-04T04:02:11+5:30
तर ‘सिव्हिल’ला दीडशे रुग्ण महिनाभरात बदलली स्थिती : जिल्हा रुग्णालयात ओपीडी, प्रसूती विभागाची सेवा पुन्हा बंद औरंगाबाद : ...
तर ‘सिव्हिल’ला दीडशे रुग्ण
महिनाभरात बदलली स्थिती : जिल्हा रुग्णालयात ओपीडी, प्रसूती विभागाची सेवा पुन्हा बंद
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात दाखल कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी दोनशेवर गेली. जिल्हा रुग्णालयातही दीडशे रुग्ण भरती आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा रुग्णालयातील ओपीडी आणि प्रसूती विभागातील रुग्णसेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे.
घाटी रुग्णालयात १ फेब्रुवारी रोजी कोरोनाचे केवळ ४१ रुग्ण दाखल होते; परंतु ही संख्या मंगळवारी २१८ झाली. यात तब्बल ९० रुग्ण गंभीर आहेत. याशिवाय कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह असलेल्या २६ रुग्णांवरही घाटीत उपचार सुरू आहेत. घाटीत गंभीर अवस्थेत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागांतून, खाजगी रुग्णालयांतून आणि अन्य जिल्ह्यांतूनही रुग्णांना घाटीत रेफर केले जाते. अवघ्या महिनाभरात रुग्णसंख्या दोनशेवर गेली आहे. त्यामुळे सुपरस्पेशालिटी इमारतीबरोबर पुन्हा एकदा मेडिसिन विभागात कोरोना रुग्णांवर उपचार करण्याची वेळ ओढावली आहे.
१५ प्रसूतीनंतर सेवा बंद
जिल्हा रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच प्रसूती विभाग सुरू करण्यात आला होता. याठिकाणी १५ प्रसूती झाल्या; परंतु कोरोनामुळे या विभागाची सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली. सध्या कोरोनाचे दीडशे रुग्ण दाखल असून, ओपीडी आणि प्रसूती विभागातील सेवा बंद करण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले.